योग्य दर मिळण्यासाठी देवळ्यात शेतकऱ्यांचे आंदोलन 

नाशिक : कांद्याला योग्य दर मिळावा यासह इतर मागण्यांसाठी देवळा येथे शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले.  ग्राहकांचे हित जपण्यासाठी कांदा उत्पादकाला आर्थिक गर्तेत ढकलू नये, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

जिल्ह्याला कांद्याचे आगार म्हटले जात असले तरी कांद्याने शेतकऱ्यांवर अनेकदा कर्जाचा डोंगर वाढवलेला आहे. प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही कळवण, सटाणा, देवळा, मालेगाव भागांतील कांदा उत्पादकांनी उन्हाळी कांदा साठवून ठेवला आहे. कांद्याच्या सुरुवातीच्या हंगामात करोनामुळे टाळेबंदीत  प्रत्यक्ष बाजार समित्या बंद आणि आता चाळीत साठवलेल्या कांद्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. त्यात मागील वर्षी निकृष्ठ रोपांमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. सध्या काही प्रमाणात कांद्याच्या दरात काही अंशी वाढ होत आहे. तरीही दरवाढ कांदा उत्पादकांना परवडणारी नाही. त्यामुळे केंद्र सरकारने ग्राहकांच्या हितासाठी चुकीचा निर्णय घेऊन कांदा उत्पादकांचे नुकसान करू नये, याउलट केंद्र सरकारने दरवाढ होण्यासाठी निर्यातीला चालना द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेकडून  करण्यात आली आहे.

दक्षिण भारतात पावसामुळे काही प्रमाणात कांदा पिकाचे नुकसान झाल्याने नाशिक अहमदनगरच्या उन्हाळी कांद्याला मागणी वाढली आहे. परंतु,उन्हाळी कांद्याचा साठा पाहता यापुढे कांदा दरात मोठी वाढ होणे तूर्तास तरी शक्य नसल्याचा अंदाज कृषी बाजारभाव तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. आज सरासरी १४००  ते १६०० रुपये  प्रति क्विंटल दराने कांदा विकला जात आहे. त्यात केंद्र सरकारने ग्राहकहित जोपासताना कांदा उत्पादक भरडला जाणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. निर्यातीला चालना देऊन नुकसानीच्या खाईत अडकलेल्या शेतकऱ्याला चांगला दर मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने अग्रेसर असायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया कांदा उत्पादकांकडून व्यक्त होत आहे.

कांद्याचे रोप तयार करत असताना मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे कांदा रोपांचे लाखो रुपयांचे झालेले नुकसान, रोपांच्या नुकसानमुळे उशिरा झालेली लागवड त्यामुळे उत्पन्नात घट सोसावी लागली. तसेच चाळीत साठवलेला उन्हाळी कांदा काही महिने करोनाच्या गर्तेत सापडला. आता चाळीत साठवलेल्या कांद्याला वातावरणात असलेल्या आद्र्रतेमुळे कोंब येणे तसेच सडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. अशा परस्थितीत नुकसान झालेल्या कांद्याला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी के ली आहे. सध्या कांद्याच्या प्रतवारीनुसार प्रति क्विंटल १४०० ते १६०० रुपयांपर्यंत दर मिळून कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. तरी हा दर नुकसानीच्या बदल्यात कमीच आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ग्राहक हितासाठी

मागील वर्षी पाठवलेले केंद्रीय पथक या वर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठीही पाठवावे आणि कांदा दरासंदर्भात कायमस्वरूपी अभ्यासपूर्वक धोरण ठरवावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

ग्राहक हितासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्याला आर्थिक गर्तेत ढकलून त्याचे नुकसान करू नये, अन्यथा कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून तालुका आणि जिल्हा प्रशासकीय कार्यालयात कांदा ओतून तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल.

– भारत दिघोळे (अध्यक्ष, महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटना)