पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या कोअर कमिटीने संप मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत सोमवारपासून महाराष्ट्र बंदचा निर्णय शेतकरी नेत्यांनी घेतला. शेतकरी संपाचे पुढील धोरण ठरवण्यासाठी आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी सुरु असलेला शेतकऱ्यांचा हा लढा अधिक तीव्र होणार असल्याची संकेत दिसत आहेत.

नाशिकच्या पंचवटी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रविवारी पार पडलेल्या बैठकीत शेतकरी नेत्यांनी पुढील चार दिवस हा संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे आश्वासन न देता प्रत्यक्ष कृती करावी, अशी मागणी बैठकीस उपस्थित शेतकरी नेत्यांनी केली. तसेच महाराष्ट्र बंदची हाक देत शेतकऱ्यांच्या लढ्यात राज्यातील अडत व्यापारी, वाहतूकदार, नागरिक यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही यावेळी नेत्यांनी केले. अजित नवले, बुधाजीराव मुळीक, रामचंद्रबापू पाटील आणि रघुनाथ दादा पाटील आदी शेतकरी नेते या बैठकीस उपस्थित होते.

पुणतांब्यानंतर शेतकरी संपाचा लढा नाशिक जिल्ह्यात अधिक तीव्र होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. शेतकरी संपाबाबतचे सर्व निर्णय नाशिकमधून घेतले जात असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या या संपात सामील विविध शेतकरी नेत्यांमध्ये फुट पडत आहे. एक जूनपासून या शेतकरी संपात किसान क्रांती सभा, तसेच राज्यातील विविध शेतकरी नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि इतर पक्षांतील नेत्यांचा स्थानिक पातळीवरून पाठिंबा मिळत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.