महावितरण अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

लोकसत्ता वृत्तविभाग

कळवण : तालुक्याच्या पुनद खोऱ्यातील मोकभणगी, दरेभणगी, धनेर या गावातील शेतीपंपांसाठी दोन ते तीन महिन्यापासून वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने परिसरातील एक हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतीपंपांना सुरळीत वीज पुरवठा सुरु करावा, या मागणीसाठी पुनद खोऱ्यातील शेतकऱ्यांनी येथे महावितरणच्या कार्यालयासमोर तीन तास ठिय्या दिला. महावितरणच्या कार्यकारी अभियंतांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

महावितरणकडून काही दिवसापासून कळवण तालुक्यात कृषिपंप आणि गावांना सुरळीत वीजपुरवठा मिळत नसून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे पिकांना पाणी कसे द्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो. सध्या रब्बीचा हंगाम सुरु असून शेतात पीक उभे आहे . वीज पुरवठा सुरळीत मिळत नसल्यामुळे पाण्याअभावी पिके हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने तालुक्यातील शेतकरी मोठय़ा संकटात सापडले आहेत . एकीकडे पिकांना पाणी देता येत नाही. आणि दुसरीकडे अनेक गावात वीज पुरवठय़ाअभावी टंचाई निर्माण झाली असल्याने शेतकरी तसेच सर्वसामान्यांना दुहेरी संकटाला तोंड द्यावे लागत असल्याची परिस्थिती आहे. पिंपळे खुर्द वीज उपकेंद्रातून मोकभणगी परिसरात वीज पुरवठा कार्यन्वित केल्यास अन्य भागातील वीजेचा दाब कमी होण्यास मदत होऊन तालुक्यात वीज पुरवठा सुरळीत होऊ शके ल. त्यामुळे महावितरणने तातडीने उपाययोजना करावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

महावितरण कार्यालयासमोर ठिय्या दिलेल्या शेतकऱ्यांशी आमदार नितीन पवार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांनी भ्रमणध्वनीवरुन चर्चा करुन अडचणी समजून घेतल्या. त्यानंतर महावितरणचे कार्यकारी अभियंता भोये यांच्यासह उपकार्यकारी अभियंत्यांना मोकभणगी, दरेभणगी, धनेर परिसरातील शेतीपंपाना सुरळीत वीज  पुरवठा देण्यासाठी सर्वेक्षण करुन उपाययोजना करण्याची सुचना केली. कार्यकारी अभियंता भोये यांनी मोकभणगी परिसरात पिंपळे खुर्द आणि अन्य उपकेंद्रातून तसेच इतर ठिकाणाहून वीज उपलब्ध करुन देण्याविषयी आमदार नितीन पवार यांनी सूचना केली. त्याबाबतचे सर्वेक्षण आणि वरिष्ठ यंत्रणेचे मार्गदर्शन घेऊन उपाययोजना करण्यात येईल. शेती पंपाना सुरळीत वीज उपलब्ध करुन देण्यासाठी शेतकऱ्यांनी सुचविलेल्या उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक धनंजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष संदिप वाघ, अविनाश शेवाळे, कौतिक गांगुर्डे आदींनी महावितरणच्या यंत्रणेशी सुरळीत वीज उपलब्ध होण्यासाठी उपाययोजना सुचविल्या.