अनिकेत साठे, नाशिक

एक एकरात कांदा लागवड करतांना बियाणे, मजुरी, औषधे, खत आदींवर ३० हजार रुपये खर्च झाले. अतिवृष्टीमुळे उत्पादन झाले केवळ चार क्विंटलचे. तो विकून ३० हजार रुपये मिळा्ले. म्हणजे जेवढी गुंतवणूक, तेवढेच पैसे मिळाले..

लासलगाव बाजारात कांदा विक्री करणारे चांदवडचे शांताराम गांगुर्डे यांनी ही अवस्था मांडली. बाजारात सध्या जे कोणी कांदा विकतात. त्या बहुतेकांची प्रतिक्रिया एकसारखीच आहे. कांद्याने इतिहासातील उच्चांकी भाव गाठला, पण शेतकऱ्यांना नफा दुर्लभच राहिल्याचे चित्र आहे. लासलगाव बाजार समितीत गुरूवारी ५२५८ क्विंटल नव्या कांद्याची आवक झाली. त्याला कमाल १०,०१२ तर किमान दोन हजार, सरासरी ७००१ रुपये दर मिळाले. कांदा घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची संख्या जेमतेम ४११. कोणाचा चार-पाच क्विंटल, तर कोणाचा १० ते १२ क्विंटल माल. बाजारात सर्वाधिक म्हणजे २२ क्विंटलपर्यंत कांदा घेऊन येणारा एखाद-दुसरा श्रीमंत शेतकरी सापडतो. अवेळी झालेल्या पावसामुळे काढणीवर आलेल्या नव्या कांद्याचे प्रचंड नुकसान झाले. ज्या एक एकरमध्ये ६० ते ७० क्विंटल कांदा निघतो, तिथे जेमतेम चार-पाच क्विंटलचे उत्पादन झाले, असे गांगुर्डे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. येवल्याच्या अनकाईचे नंदू बदे यांनी बाजार समितीत १९ क्विंटल कांदा विकला. त्यांना एक लाख २० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. लवकरच आणखी १० ते १२ क्विंटल आकाराने लहान कांदे काढणीवर येतील, अशी त्यांची अपेक्षा आहे. चार एकरमध्ये त्यांनी कांदा लागवड केली होती. कर्ज काढून भांडवल गुंतवले. परंतु या कांदा विक्रीतून केवळ कर्ज फिटले जाईल. पुन्हा पीक कर्ज घेऊन लागवड करावी लागेल, असे ते सांगतात. दरवर्षी एकरी १०० क्विंटलचे उत्पादन मिळते. पावसाने इतके नुकसान केले की, नेहमीच्या तुलनेत पाच टक्केही उत्पादन मिळाले नसल्याचे बदे यांनी सांगितले.

एरवी या काळात बाजार समित्यांमध्ये कांद्याचा महापूर असतो. लासलगाव बाजारात दररोज हजार ते १२०० शेतकरी २० ते २५ हजार क्विंटल माल आणतात. इतर बाजार समित्यांमध्ये वेगळी स्थिती नसते. आज हे प्रमाण तीन ते चार हजार क्विंटलपर्यंत खाली घसरले आहे. डिसेंबर अखेपर्यंत उशिराच्या खरीपाची आवक सुरू होईल. ती आवक वाढल्यानंतर कांद्याचा तुटवडा काही अंशी कमी होईल. इतिहासात उच्चांकी दर गाठल्याने कांद्याची देशपातळीवर चर्चा होत आहे. दर आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारही बैठका घेत आहे. परंतु, त्या उच्चांकी दरातून ना नफा, ना तोटय़ाचे समीकरण शेतकरी मांडत आहेत.

गेल्या काही दिवसांत नवीन कांदा घेऊन येणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढत आहे. पंधरवडय़ापूर्वी केवळ ७० ते ८० शेतकरी कांदा घेऊन यायचे. आता ती संख्या ३०० ते ४०० पर्यंत पोहचली आहे. माल घेऊन येणारे शेतकरी वाढत असले तरी मालाचे प्रमाण चार क्विंटल ते अधिकतम २० क्विंटल पुरतेच मर्यादित आहे.