News Flash

शेततळी बांधण्यात राज्यातील हजारो शेतकरी असमर्थ

या योजनेंतर्गत तळ्याच्या आकारानुसार किमान २६ ते कमाल ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते

आर्थिक अडचणी, अनुदानास झालेला विलंब कारणीभूत

अनिकेत साठे, नाशिक

‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेंतर्गत नाशिकमध्ये चार वर्षांत २५ हजार १९४ शेतकऱ्यांना जागा पडताळणी करून कार्यारंभ आदेश देण्यात आले. प्रत्यक्षात केवळ ९,६६२ शेततळी बांधून पूर्ण झाली. अनुदानास विलंब, आर्थिक अडचणी, लांबलेल्या पावसामुळे पाण्याची उपलब्धता, आदी कारणांमुळे १५ हजार ४२६ शेतकऱ्यांनी शेततळी बांधण्याकडे पाठ फिरविली.

दुष्काळात शेततळ्याचे महत्त्व लक्षात येते. काही वर्षे अशा स्थितीला वारंवार तोंड द्यावे लागल्याने शेततळी बांधण्याकडे कल वाढला. चार वर्षांपूर्वी राज्यात ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना अस्तित्वात आली. पहिले वर्ष त्याचे महत्त्व पटवून देण्यात गेले. नियमित स्वरूपाची ही योजना स्थिरस्थावर झाली असतानाच त्यात शेतकऱ्यांचा सहभाग दोलायमान असल्याचे दिसून येते.

या योजनेंतर्गत तळ्याच्या आकारानुसार किमान २६ ते कमाल ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. शासनाने निश्चित केलेल्या निकषानुसार शेततळे उभारावे लागते. त्यासाठी ७० हजारते सव्वा लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. म्हणजे जितके अनुदान मिळते, तेवढीच रक्कम शेतकऱ्यास गुंतवावी लागते. अर्ज मंजुरीनंतर कृषी सहाय्यक अर्जदाराने निवडलेली जागा शेततळ्यासाठी योग्य आहे की नाही, याची पाहणी करतात. नंतर काम सुरू करण्याचे आदेश दिले जातात.

चार वर्षांत आतापर्यंत कृषी विभागाकडे २९ हजार ३१६ शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत. संबंधितांच्या जागेची पडताळणी होऊन यातील २५ हजार १९४ जणांना कार्यारंभ पत्र देण्यात आले. या काळात प्रत्यक्षात ९,६६२ शेततळी बांधली गेली.

पहिल्या तीन वर्षांत शेततळी उभारण्याचा वेग लक्षणीय होता. वर्षांला सरासरी अडीच हजार शेततळी बांधण्यात आली. पण, चौथ्या म्हणजे चालू वर्षांत तो वेग कमालीचा घसरून ५६७ शेततळ्यांवर आल्याचे दिसून येते. सध्या १०६ कामे प्रगतिपथावर आहेत.

अडचण काय?

* कृषी विभागाने हिरवा कंदील दाखवूनही हजारो शेतकऱ्यांनी शेततळी बांधली नाहीत. त्यास आर्थिक अडचणी कारक ठरल्याची शक्यता तंत्र अधिकारी जयंत गायकवाड यांनी व्यक्त केली. अनुदान मिळणार असले तरी वरचा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यास करावा लागतो. अर्ज करताना काही आर्थिक तजवीज असू शकते. कार्यारंभ आदेश हाती पडतेवेळी स्थिती बदलल्याने तो भार पेलणे अशक्य होते.

* शेततळे बांधण्यास महिनाभराची मुदत असते. अपवादात्मक स्थितीत ती वाढवूनही दिली जाते. शेततळी बांधणीकडे पाठ फिरविण्यामागे उशिराने मिळणारे अनुदान हेदेखील महत्त्वाचे कारण आहे. अनेकांना सहा महिने, वर्षभर अनुदानाची वाट पहावी लागली. त्यामुळे इतरांनी अंग काढून घेतले. कृषी विभागाचे म्हणणे वेगळे आहे. आतापर्यंत बांधून पूर्ण झालेल्या ९,६६२ पैकी ९,२९८ शेततळ्यांसाठी ४४ कोटी ८७ लाख रुपयांचे अनुदान वितरित झाल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे.

* काही जण शेजारील शेतकऱ्याने शेततळे बांधले म्हणून देखील अर्ज करतात. त्यांना शेततळे बांधायचे नसते, असेही काही अनुभव तालुकास्तरीय कृषी अधिकाऱ्यांनी मांडले. चालू वर्षांत पावसाने प्रदीर्घ काळ मुक्काम ठोकला. नदी-नाले, धरणे ओसंडून वाहिले. पाण्याची उपलब्धता शेतकऱ्यांना शेततळे बांधणीपासून दूर घेऊन गेल्याचे कृषी विभागाचे निरीक्षण आहे.

नाशिक जिल्ह्य़ातील स्थिती

वर्ष          पूर्ण झालेली शेततळी   प्रगतीपथावरील  कामे         खर्च (अनुदान वितरण)

 

२०१६-१६       २१८५                            –                                          १० कोटी ४७ लाख

२०१७-१८       ३९१८                            –                                          १७  कोटी ६३ लाख

२०१८-१९       २९९२                            –                                          १२ कोटी ६२ लाख

२०१९-२०       ५६७                          १०६                                         चार कोटी १३ लाख

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 2:17 am

Web Title: farmers in the state unable to constructed farm ponds zws 70
Next Stories
1 श्री सप्तश्रृंगी मंदिरातील गर्भगृह दर्शनास नववर्षांपासून बंदी ; देवस्थानचा निर्णय
2 नववर्षांत महापालिका कर्मचारी संपाच्या तयारीत
3 ग्रहणामुळे पाणीपुरवठा बंद ठेवणाऱ्यांविरोधात कारवाई करा
Just Now!
X