बागायती क्षेत्रातून जाणारे पॉवरग्रिड कंपनीचे वीजमनोरे तातडीने इतरत्र हलवावेत या मागणीसाठी सोमवारी दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले. दोन दिवसांपूर्वी अवनखेड शिवारात काम सुरू असताना मनोरा कोसळला होता. या ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन करीत मनोरा उभारणीला कडाडून विरोध दर्शविला.

पॉवरग्रिड कंपनीकडून वीज वाहून नेण्यासाठी निफाड, चांदवड व दिंडोरी तालुक्यांत मागील दोन वर्षांपासून मनोरे उभारण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी जागा देण्यास आधीपासून शेतकऱ्यांचा विरोध आहे. कंपनीकडून अतिशय कमी भरपाई दिली जात असून शासकीय यंत्रणांचा वापर करून हे काम पुढे रेटले जात असल्याचा स्थानिक शेतकऱ्यांचा आक्षेप आहे. या घडामोडी घडत असताना अवनखेड येथे मनोरा कोसळून तीन कामगार जखमी झाले. हा मुद्दा घेऊन शेतकरी आता मैदानात उतरले आहेत. मनोरा कार्यान्वित झाला नसतानाच ते कोसळत आहेत. हे मनोरे कार्यान्वित झाल्यावर काय होईल, विजेचा मनोरा कोसळला तर होणाऱ्या जीवितहानीला कोण जबाबदार, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला. बागायती आणि रहिवासी क्षेत्रामधील मनोरा काढण्याचे आश्वासन जोपर्यंत शासन देत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यां शेतकऱ्यांनी दिला आहे. स्थानिक प्रशासन मनोऱ्यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही असे सांगत होते. तथापि, या घटनेने त्याचे वास्तव दर्शविले. सरपंच नरेंद्र जाधव, रघुनाथ पाटील, सुदाम शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे या शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली ११० शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी आंदोलन सुरू केले. भविष्यात अशी घटना घडू नये, कोणाच्या जीवितास धोका पोहोचू नये, यासाठी शासनाने हे मनोरे इतरत्र हलवावे, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आ. नरहरी झिरवाळ, श्रीराम शेटे, प्रांताधिकारी उदय किसवे, तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली.