माजी आमदार जे. पी. गावित यांचे आवाहन

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात पारंपरिक कुशल पद्धतीने विज्ञान तंत्रज्ञान अवगत करून शेतकरी शेतीत बदल करून लाखोंचे उत्पन्न पदरी पाडून घेत आहेत. यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्ह्यसह राज्यात नाव कमावले आहे. यासाठी उच्यशिक्षित तरुणांनी मोठय़ा प्रमाणावर पुढाकार घेतला असून पारंपरिक शेतीपद्धतीला फाटा देत नवीन तंत्रज्ञान शोधण्यावर भर दिला आहे. शेती उत्पादनातून लाखो रुपयांचा फायदा होत आहे. त्याच बरोबर मधमाशी पालनाद्वारे लाखो रुपयांचे उत्पन्न शेतकऱ्यांनी घ्यावे, असे आवाहन माजी आमदार जे. पी. गावित यांनी केले.

आडगाव (ता.त्र्यंबकेश्वर) येथे अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट नाशिक सामाजिक  संस्थेच्यावतीने मधमाशी पालन केंद्राचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी गावित यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन के ले. शासनाने करोना काळात घालून दिलेल्या नियमांचे पालन करत व्यासपीठावर माकपचे जिल्हा सचिव इरफान शेख, पंचायत समितीचे माजी सभापती ज्योती राऊत, जि. प. सदस्य रमेश बरफ, उपसभापती देवराम मौळे,भाऊराम चौधरी,रामदास पखाने, संस्थेचे भिला ठाकरे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी गावित यांनी अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट नाशिक सामाजिक  संस्थेच्या माध्यमातून  १० मधमाशी पालन  केंद्र उभारण्यात आले असून  त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील तरुणांना त्यामुळे व्यवसाय प्राप्त झाला असल्याचे सांगितले. यामुळे तरुणांचे लहान— मोठय़ा व्यावसायातील मनोबल वाढले असल्याचेही त्यांनी नमूद के ले. संस्थेचे भिला ठाकरे यांनी संस्थेच्या कामकाजाबाबत प्रकाशझोत टाकून प्रास्ताविक के ले. यावेळी सुभाष मौळे, खडेश्वर खोटरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.