पाठीवरती हात ठेवून लढ म्हणा..!

शून्यात हरवलेले डोळे.. सर्वत्र पाणीच पाणी.. कोणी शिवारात पाण्यात सडलेलं पीक काढत आहे, तर कोणी कुजलेल्या पिकात थोडीफार आशा जिवंत आहे काय, हे शोधण्यात मग्न, असे चित्र सध्या जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात आहे. कष्टपूर्वक जपलेले पीक वाया जाण्याच्या वेदना शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतात. अशा कठीण प्रसंगी हिंमत न हरता शेतकऱ्यांनी पुन्हा उभे राहावे, यासाठी सर्वसामान्यांपासून राजकारण्यांपर्यंत सर्व जण त्यांना धीर देत आहेत. अवकाळी पावसाने शेतकरी अस्मानी संकटात सापडला. आता सरकारकडून नुकसानभरपाई कधी मिळेल, याची वाट न पहाता शेती पुन्हा एकदा सावरण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.

जिल्ह्य़ात परतीच्या पावसाने अधिक दिवस मुक्काम ठोकल्याने सर्व शेतांमध्ये पाणीच पाणी, चिखल असे चित्र आहे. धरणे पाण्याने तुडुंब भरलेली असताना गावातील बंधारेही पाण्याने भरून वाहू लागले आहेत. वाहणं विसरून गेलेल्या अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. पावसाचे पाणी, बंधाऱ्याचे पाणी शेतात जमा होत आहे. सततच्या पावसाने आणि मुळात शेतात साचलेल्या पाण्यामुळे हातातोंडाशी आलेला मका, बाजरी, सोयाबीन, कांदा ही पिके सडण्यास सुरुवात झाली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकरी आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. गाव शिवारात सखल किंवा उताराकडे असलेल्या भागात पावसाचे पाणी आणि इतरांच्या शेतातून वाहत आलेले पाणी साचत असल्याने पिके गुडगाभर पाण्यात आहेत. मोटार लावून किंवा कुठे शेतीचा बांध फोडून शेतीत जमा झालेले पाणी बाहेर काढण्यात येत आहे.

काही ठिकाणी बांधाला बांध लागून असलेल्या शेतांमधून सरळ रेषेत बांध फोडत चारी काढून हे पाणी नाल्याकडे फिरविले जात आहे. पाण्याची विल्हेवाट लावत असताना कुटुंबातील अन्य सदस्य शेतातील सोयाबीन, बाजरी किंवा भात अशा पिकांमध्ये काही बरे दिसते का ते पाहत आहे. दिवसभरात थोडय़ा वेळासाठी का होईना होणाऱ्या सूर्यदर्शनामुळे येणाऱ्या उन्हात हे पीक पत्र्यावर किंवा माळरानावर नेत कापडी आच्छादन टाकत वाळविण्याचा प्रयत्न होत आहे. सर्वत्र चिखल असल्याने पिकांचे भारे डोक्यावर ठेवूनच नेले जात आहेत. काहींनी घराच्या ओसरीतील सर्व सामान बांधून ठेवत ओसरी मोकळी करत पीक तेथेच वाळविण्यास सुरुवात केली आहे.

देवळा तालुक्यातील शेतकरी महेश बच्छाव यांनी सततच्या पावसामुळे होतं नव्हतं ते तर गेलं, पण पुढे काय, या प्रश्नाचे उत्तर शोधणं गरजेचे असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पाण्याची उपलब्धता पाहता नाइलाजास्तव कांदा लागवड करावी लागत आहे. दोन महिने उशिराने कांद्याची लागवड होत आहे. कांदा रोपे आणतोय. दोन दिवस ते तग धरतात, पण पाऊस पडला की कोमेजून किंवा सडून जातात. सततच्या पावसात ते टिकाव धरत नाहीत, असे त्यांनी नमूद केले. इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी भिजलेले भात पीक शेतातून काढून घरात सुकत ठेवले असल्याचे तानाजी कुंदे यांनी सांगितले.