21 October 2020

News Flash

कांदा निर्यातबंदी विरोधात प्रतीकात्मक अंत्ययात्रा

तहसीलदारांना निवेदन सादर 

मालेगाव येथे काढण्यात आलेल्या प्रतीकात्मक अंत्ययात्रेत सहभागी शेतकरी.

तहसीलदारांना निवेदन सादर 

मालेगाव : कांदा निर्यातबंदीचा निर्णय शेतकऱ्यांना आर्थिक गर्तेत ढकलणारा असल्याची तक्रार करत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे सोमवारी येथे केंद्र सरकारच्या निर्यातबंदी आदेशाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. या वेळी आंदोलकांनी गळ्यात कांद्याच्या माळा घातल्या होत्या. हातात केंद्र शासनाचा निषेध करणारे फलक घेतले होते.

सटाणा नाका भागातून अंत्ययात्रेस सुरुवात झाली. ट्रॅक्टरवर शेतकरी गळफास लावून आत्महत्या करीत असल्याचे दृश्य दाखविण्यात आले होते. तसेच अंत्ययात्रेत सामील झालेल्या चौघा शेतकऱ्यांनी तिरडीस खांदा दिला होता आणि अग्रभागी डोक्यावर घोंगडे पांघरलेला शेतकरी हातात मडके घेऊन चालत होता. सटाणा रोड, साठफुटी रस्त्यामार्गे तहसील कार्यालयाजवळ अंत्ययात्रा अडविण्यात आली.

काही दिवसांत कांद्याला चांगला भाव मिळू लागल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा अधिक पैसे मिळू लागले असतानाच केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी लादली. त्यामुळे कांदा उत्पादकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

देशभरातील शेतकऱ्यांना शेती विकासाचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या मोदी सरकारची प्रत्यक्ष कृती शेतकरी विरोधी राहिल्याचा आरोप संघटनेने या वेळी केला. संघटनेच्या वतीने तहसीलदार चंद्रजित राजपूत यांना निवेदन देण्यात आले. केंद्र शासनाने लागू केलेला कांद्यावरील निर्यात बंदी आदेश त्वरित मागे घ्यावा आणि शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. या अंत्ययात्रेत संघटनेचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत शेवाळे, नरेंद्र शेवाळे, मधुकर शेवाळे, विरकुमार शेवाळे, संदीप शेवाळे, योगेश शेवाळे आदींसह परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 1:09 am

Web Title: farmers union protest against onion export ban zws 70
Next Stories
1 धरणसाठा ९४ टक्क्यांवर, १५ धरणे तुडुंब
2 अंतिम वर्षांच्या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा पद्धतीत सामावून घ्या
3 अभाविप’तर्फे उदय सामंत यांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न
Just Now!
X