नांदगाव

तालुका दुष्काळी जाहीर करण्यात यावा, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे येथील जुन्या तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.

तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने बऱ्याच ठिकाणी पेरणी झालेली नसून काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर आहे. यावर शासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, शेतकऱ्यांचे २०१७ पर्यंतचे कर्ज माफ करावे, संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, जनावरांसाठी चारा देण्यात यावा आदी मागण्या उपोषणादरम्यान करण्यात आल्या. तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत मागण्या जाणून घेतल्या. आपल्या मागण्या वरिष्ठांकडे पाठविण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. या उपोषणात प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष जनार्दन पगार, विनोद बोडखे, संदीप सूर्यवंशी, गोकुळ थोरे आदी सहभागी झाले होते.