सारडा सर्कलची दुकाने पुन्हा उघडली

लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : भाडेकरूंनी जागा सोडावी यासाठी दुकानांवर तांदूळ, मिरची, राख फेकण्याचा प्रकार घडल्यानंतर भयभीत झालेल्या दुकानदारांचे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रबोधन केल्यावर पुन्हा दुकाने उघडण्यात आली. शहरातील सारडा सर्कल परिसरात हा प्रकार घडला. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रोर दाखल करण्यात आली आहे. संशयितांवर कारवाई करण्याची मागणी दुकानदारांकडून करण्यात आली आहे.

सारडा सर्कल भागात हजरद दावल सॉ मसजिद टस्टची ५० दुकाने आहेत. या दुकानांच्या जागेवरून संशयित जक्की गुलाम हुसेन खतीब यांचा तेथील गाळेधारकांशी वाद सुरू आहे. या संदर्भात मुंबई, औरंगाबाद तसेच नाशिक न्यायालयात प्रकरणे दाखल आहेत. २४ जानेवारी रोजी औरंगाबाद खंडपीठात त्याबाबत  सुनावणी होणार आहे. त्याआधीच अमावस्येच्या रात्री कोणीतरी सर्व दुकाने बंद झाल्यावर तांदूळ, मिरची, राख असे पदार्थ दुकानांवर फेकले. हे करणारी व्यक्ती  सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे. आपल्या दुकानांवर तांदूळ, मिरची, राख पाहताच कोणीतरी करणी के ल्याचा त्यांचा समज झाला. अंधश्रद्धेमुळे त्यांच्यात भीती निर्माण झाली. त्यातच एका गाळेधारकाचा मुलगा आजारी पडल्याने दुकानदार अधिकच धास्तावले. काहींनी मौलवीकडून उतारा म्हणून तावीज आणले तर काहींनी दुकानेच बंद ठेवली.

या घटनेची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांना समजताच त्यांनी भयभीत झालेल्यांना धीर दिला. राज्य सरचिटणीस डॉ. टी. आर. गोराणे, प्रा. डॉ. सुदेश घोडेराव, प्रा. सुशीलकुमार इंदवे, महेंद्र दातरंगे यांच्यासह त्यांनी व्यापाऱ्यांची भेट घेत अंधश्रद्धेविरोधात प्रबोधन करत, त्यांच्या मनातील भीती घालविली. त्यानंतर सर्वांनी आपल्या मनातील भीती झुगारून आपापली दुकाने उघडली. व्यापारी बांधवांच्या मनात भीती निर्माण व्हावी आणि न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने लागावा म्हणून संशयिताने  हे कृत्य केले असल्याचा संशय महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांंनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांंनी दुकानदारांना घेऊन भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांची भेट घेतली. पीडितांच्या वतीने असिफ सय्यद, मुद्दस्सर सय्यद यांनी तक्रार दाखल केली. यावेळी खान समीर अमान, मिर्झा एजाज जावेद बेग, युनूस गुलाम अब्बास भारमल, सय्यद जायेद समीम, काजम्ी अयाज हिसामोदिन, कासिम अकबरअली ट्रंकवाला आदी उपस्थित होते. सीसीटीव्हीतील चित्रण पोलिसांकडे देण्यात आले आहे.