दोन कचरावेचक महिलांच्या मृत्यूनंतर महापालिकेला जाग

पांडवलेणीलगतच्या खत प्रकल्पावर कचरा वेचताना ढिगाऱ्याखाली सापडून दोघींचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेची महापालिकेने गंभीर दखल घेतली असून या ८२ एकरच्या परिसरात कोणालाही प्रवेश करता येऊ नये यासाठी सुरक्षारक्षकांची संख्या दुपटीने वाढवितानाच प्रकल्पाच्या मागील बाजूस पक्क्या स्वरूपाची संरक्षक भिंत उभारण्याची तयारी केली जात आहे. उपरोक्त प्रकल्पात विघटन होऊ न शकलेल्या कचऱ्यावर मातीचे अस्तरीकरण करण्यापूर्वीच ही दुर्घटना घडली.

महापालिकेच्या खत प्रकल्पावर दररोज शेकडो टन कचरा आणला जातो. यामुळे या ठिकाणी कचऱ्याचे मोठे ढीग दृष्टिपथास पडतात. पांडवलेणीलगतच्या कवटेकरवाडी वस्तीतील काही महिला कचऱ्यातील साहित्य वेचण्यासाठी या प्रकल्पावर जात असतात. बुधवारी पहाटेच्या सुमारास सुरक्षारक्षकांची नजर चुकवून काही जण आतमध्ये गेले होते. कचऱ्यातील साहित्य गोळा करत असताना अचानक ढिगारा कोसळला आणि त्याखाली अडकून पूनम बाळू माळी (४०) आणि कोमल बाळासाहेब माळी (८) यांचा मृत्यू झाला. गुरुवारी उभयतांचे मृतदेह शोधण्यात आले. या घटनाक्रमामुळे खत प्रकल्पावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आ. सीमा हिरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन कचऱ्याच्या ढिगाऱ्यांची तातडीने विल्हेवाट लावण्याची मागणी केली. महापालिकेने या दुर्घटनेची दखल घेतली असल्याचे अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांनी सांगितले. ८२ एकर क्षेत्रावर पसरलेल्या या प्रकल्पात तीन पाळीत प्रत्येकी दोन सुरक्षारक्षक कार्यरत असतात. प्रकल्पाचे विस्तीर्ण क्षेत्र आणि तुलनेत सुरक्षारक्षक कमी आहे.

ज्या दर्शनी भागातून कचरा घेऊन येणाऱ्या घंटागाडय़ांची ये-जा होते, तसेच खत निर्मितीचे काम सुरू असते, त्या ठिकाणी सुरक्षारक्षक व कामगारांचा वावर असतो. या संपूर्ण प्रकल्पातील काही भागात पक्क्या स्वरूपाची संरक्षक भिंत तर काही ठिकाणी तारेचे कुंपण आहे. मागील बाजूने असणारे तारेचे कुंपण व त्याचे खांब चोरीला गेलेले आहेत. या परिसरातून प्रकल्पात प्रवेश केला जातो. ही बाब लक्षात घेऊन सुरक्षारक्षकांची संख्या दुपटीने वाढवून त्या ठिकाणी नजर ठेवली जाणार आहे.

या व्यतिरिक्त प्रकल्पातील ज्या भागात संरक्षक भिंतीचे नुकसान झाले आहे, तिथे नव्याने पक्क्या स्वरूपाची संरक्षक भिंत उभारण्याचा विचारही केला जात आहे.

ज्या कचऱ्याचे खत बनत नाही, म्हणजे ज्याचे विघटन होत नाही, त्याच्या ढिगाऱ्यांवर मातीच्या अस्तरीकरणाचे काम सुरू केले जात आहे. हे काम सुरू झाल्यास या स्वरूपाच्या दुर्घटना टाळल्या जाऊ शकतात. खत प्रकल्प सद्य:स्थितीत पूर्ण क्षमतेने चालविला जात नाही. या पाश्र्वभूमीवर, त्याच्या खासगीकरणासाठी निविदाही काढण्यात आली आहे.