गेल्या काही दिवसांमध्ये करोनाबाधित रुग्णांमध्ये पोलिसांची संख्याही लक्षणीय ठरत आहे. त्यांच्या संपर्कात येणाऱ्या कुटूंबातील सदस्यांनाही काही ठिकाणी करोनाची बाधा झाली. या पाश्र्वभूमीवर पोलीस किंवा त्यांच्या कुटूंबातील सदस्यांची गैरसोय होऊ नये यासाठी येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात ‘पोलीस फिव्हर क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहे.

करोनाचा वाढत्या संसर्गामुळे खासगी दवाखाने बंद आहेत. पॅथॉलॉजी प्रयोगशाळाही काठी ठिकाणी बंद ठेवण्यात आल्या आहेत. काही क्षेत्र प्रतिबंधित असल्याने अडचणी आहेत. या सर्व वातावरणात पोलिसांना संवेदनशील भागात जाऊन काम करावे लागत आहे. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे. घरी परतल्यावर कुटूंबातील अन्य सदस्यांनाही आरोग्य विषयक तक्रारी जाणवतात.

खासगी दवाखान्यांच्या आडमुठेपणामुळे नाशिक ग्रामीण पोलीस आणि त्यांच्या कुटूंबियांची गैरसोय होऊ नये यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कुटूंबियांकरीता पोलीस फिव्हर क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. सध्या तापमान बदलामुळे अनेकांना सर्दी, ताप आणि खोकल्याचा त्रास होत आहे. यामुळे वैद्यकीय महाविद्यालयात पोलीस आणि त्यांच्या कुटूंबियांची तपासणी होत आहे. ही सेवा २४ तास उपलब्ध असून समन्वय अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक नरसुडे, सहाय्यक निरीक्षक पुष्पा आरणे यांना नेमण्यात आले आहे.

पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी, त्यांच्या कुटूंबातील करोनाचा त्रास नसलेल्या रुग्णांना ताप, सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असेल तर त्यांनी पोलीस फिव्हर क्लिनिक येथे उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह, अपर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी केले आहे.