News Flash

सहकारी बँक प्रतिनिधी-एसबीआय अधिकाऱ्यामध्ये खडाजंगी

चलन गोंधळ कायम असून बँकांसमोर रांगा तर एटीएममध्ये पैशांची वानवा अशी स्थिती आहे.

चलन पुरवठय़ावरून वाद

सहकारी बँकांना पुरेसे चलन उपलब्ध केले जात नसल्याने या बँकांच्या त्रस्तावलेल्या प्रतिनिधींनी शनिवारी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्षेत्रीय कार्यालयात धडक मारून जाब विचारला. या वेळी एसबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी त्यांची जोरदार खडाजंगी झाली. राष्ट्रीयीकृत बँका पैसे देत आणि स्वीकारत नसल्याने ४४ सहकारी बँकांचे काम दोन दिवसांपासून ठप्प आहे. वाद विवादानंतर सोमवारी चलन देण्याचे आश्वासन एसबीआयने दिल्यानंतर या वादावर तुर्तास पडदा पडला. दरम्यान, बडय़ा रुग्णालयांमध्ये ५०० आणि एक हजारच्या नोटा नाकारल्या जात असल्याने रुग्ण व नातेवाईकांची परवड होत आहे. चलन गोंधळ कायम असून बँकांसमोर रांगा तर एटीएममध्ये पैशांची वानवा अशी स्थिती आहे.

पंतप्रधानांनी ५०० आणि एक हजारच्या नोटा रद्दबातल ठरविल्यानंतर निर्माण झालेला गोंधळ शनिवारी कायम होता. बँकांसमोर तासन्तास उभे राहून ताटकळणाऱ्यांना एटीएम केंद्रांचाही दिलासा मिळाला नाही. अनेक केंद्रांमध्ये पैसेच नव्हते. ज्या ठिकाणी होते, ते अवघ्या काही तासांत संपुष्टात आले. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी पैसे नसल्याने अनेकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रोखीने व्यवहार होणाऱ्या बाजार समित्यांमधील कृषिमालाचे लिलाव ठप्प झाले आहेत. परिणामी, दैनंदिन १५ ते २० कोटींची उलाढाल ठप्प झाली. लिलाव बंद राहिल्याची झळ शेतकऱ्यांना बसली आहे. यामुळे भाजीपाल्याचे दर घसरले आहेत. या घडामोडीत सहकारी बँकांमधील लाखो ग्राहक भरडले गेले. जिल्ह्यात ४४ सहकारी बँकांच्या ५५० शाखा आहेत. राष्ट्रीयीकृत बँका पैसे देत नसल्याने ग्राहकांना देण्यासाठी चलन नाही. याच मुद्दय़ावर सहकारी बँकांचे प्रतिनिधी विश्वास ठाकूर, दत्ता गायकवाड आदी ‘एसबीआय’च्या सातपूर येथील विभागीय कार्यालयात गेले असता वरिष्ठ अधिकाऱ्याने तशी काही स्थिती नसल्याचे ऐकवले. या प्रतिनिधींचे भ्रमणध्वनीवर छायाचित्रण करण्याचा प्रयत्न केला. यामुळे सहकारी बँक प्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यामध्ये खडाजंगी झाली. एसबीआयच्या इतर अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत संयुक्त बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. सहकारी बँकांमध्ये मोठय़ा प्रमाणात भरणा झाला आहे. ही रक्कमही राष्ट्रीयकृत बँका स्वीकारत नाही. दुसरीकडे चलनाअभावी ग्राहकांना पैसे देता येत नाही. राष्ट्रीयीकृत बँकांच्या कार्यशैलीमुळे एटीएम कार्ड नसलेले सहकारी बँकेतील गोरगरीब ग्राहक अडचणीत सापडल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

खासगी व राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी झुंबड उडाली आहे. शनिवार हा औद्योगिक वसाहतीतील सुटीचा दिवस. या दिवशी कामगार वर्ग मोठय़ा संख्येने जमला होता. १०० रुपयांच्या नोटांचा तुटवडा असल्याने ग्रामीण भागात चक्क सुटे पैसे देण्याचा गोरखधंदा सुरू झाल्याचे सांगितले जाते. सर्वसामान्य पैशांअभावी त्रस्त झाले असताना महापालिकेच्या तिजोरीत मोठी भर पडत आहे. विविध करांच्या थकबाकीची तब्बल ११ कोटींची रक्कम दोन दिवसात जमा झाल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली.

आधी जेवण तर करा, पैसे नंतर द्या

सुटे पैसे नसल्याने त्रस्तावलेल्या नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असतानाच गंगापूर रस्त्यावरील एका हॉटेल व्यावसायिकाने ‘सुटे पैसे नसतील तरी पोटभर भोजन करावे’ असे आवाहन करत सुखद धक्का दिला आहे. ५०० व एक हजारच्या नोटा रद्दबातल झाल्यापासून नागरिकांना वेगवेगळ्या त्रासदायक अनुभवांना सामोरे जावे लागत आहे. रद्दबातल झालेले चलन स्वीकारण्यास कोणी तयार नसल्याने खिशात पैसे असूनही त्याचा उपयोग होत नाही. सुटय़ा पैशांअभावी दुकानदारांकडून ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पाश्र्वभूमीवर, या हॉटेलचालकाने मात्र ‘सुट्टे पैसे नसतील तर ते नंतर आणून द्यावे, पण पोटभर जेवण करावे’ असे आवाहन खास फलकाद्वारे केले आहे. तीन दिवसांत जवळपास ५० ग्राहकांनी त्याचा लाभ घेतला. एकूण १५ हजार रुपयांची देयके संबंधितांना नंतर आणून देण्यास सांगण्यात आले असल्याचे हॉटेलचे संचालक पुष्कर वैशंपायन यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2016 1:33 am

Web Title: fight between cooperative banks and sbi official representative in nashik
Next Stories
1 सलग दुसऱ्या दिवशीही बँकेत झुंबड
2 वृक्षसंवर्धनासाठी कांद्याच्या गोण्यांचा आधार
3 पुलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र विभाग
Just Now!
X