महाविद्यालयात झालेल्या किरकोळ वादातून शुक्रवारी दुपारी महापौरांच्या रामायण या निवासस्थानासमोरील वसतिगृहात युवकांच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाली. दगड विटांचा मारा करण्यात आला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात धावपळ उडाली. या प्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी संशयितांना वाहनासह ताब्यात घेतले. तसेच वसतिगृहाशेजारील टपऱ्या व तत्सम ठिकाणांची तपासणी करण्यात आली.

शरणपूर रस्त्यावरील सिग्नलवरून त्र्यंबकडे जाणाऱ्या रस्त्यावर विद्यार्थी वसतिगृह आहे. महापालिका, बँका व विविध कार्यालये, महापौरांचे निवासस्थान यामुळे हा परिसर सदैव गजबजलेला असतो. वसतीगृहातील काही विद्यार्थ्यांचे महाविद्यालयात किरकोळ वाद झाले होते. त्यातून दुसरा गट दुपारी वसतीगृहावर धडकला. या ठिकाणी परस्परांमध्ये तुफान हाणामारी झाली. यावेळी दगडफेकही करण्यात आली. हा गोंधळ वसतीगृहासमोरील रस्त्यावर सुरू असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले. या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह सरकारवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यानच्या काळात दुसऱ्या गटातील एका बाहुबली राजकीय नेत्याचा समर्थक संशयित वाहनावरून पसार झाला होता. पोलिसांनी बिनतारी यंत्रणेद्वारे त्याच्या वाहनाची माहिती कळवत शोध सुरू केला. अर्धा ते पाऊण तासात त्यालाही दुचाकीसह जेरबंद करण्यात आले. वसतिगृहाजवळ वेगवेगळ्या स्वरूपाच्या टपऱ्या आहेत. त्यांचीही तपासणी करण्यात आली. महाविद्यालयातील वादातून हा प्रकार घडला असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सरकारवाडा पोलीस ठाण्यात सुरू होते.