जिल्ह्य़ात दुष्काळी स्थिती असताना पुरातन नैसर्गिक स्त्रोतांकडे दुर्लक्ष झाले आहे. निफाड तालुक्यातील नांदुर मध्यमेश्वर बंधारा कोरडाठाक पडला असताना या परिसरात पाण्याने भरलेल्या दोन पुरातन विहिरी सापडल्या आहेत. या विहिरीतील पाण्याच्या हक्कावरून ग्रामस्थांमध्ये वाद सुरू आहे. परंतु, अभयारण्यातील विहिरी वन विभागाने ताब्यात घेऊन त्यातील पाणी ग्रामस्थांबरोबर पक्ष्यांनाही पिण्यासाठी उपलब्ध करावे, अशी मागणी नेचर क्लब ऑफ नाशिकने केली आहे.

निफाड तालुक्यातील नांदुर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य सर्वपरिचित आहे. हिवाळ्यात हजारो पक्षांनी गजबजणाऱ्या या परिसराकडे सध्या दुष्काळामुळे पक्ष्यांसह सर्वानीच पाठ फिरवली आहे. बंधारा परिसरात नुकत्यात दोन पुरातन विहिरी सापडल्या असून त्यात मुबलक पाणी आहे. या भागात आणखी तीन विहिरी असल्याचे ग्रामस्थ सांगतात. पूर्वी बंधारा परिसरात मांजरगाव आणि चापडगाव ही दोन गावे होती. नंतर ती स्थलांतरीत करण्यात आली. पण त्या गावांच्या गावठाण भागात धरणाच्या अगदी मधोमध गावकऱ्यांनी जेसीबी लावून माती बाजूला केली असता चक्क दोन पाण्याने भरलेल्या विहिरी आढळून आल्या. या विहिरी सागाचे लाकडे वापरून तयार केल्याचे दिसून आले. इतके वर्ष पाण्यात राहूनही लाकूड खराब झालेले नाही हे विशेष.

या विहिरी अडीचशे वर्ष जुन्या असून ग्रामस्थांमध्ये विहिरीच्या हक्कावरून वाद सुरू आहेत. पेटलेला पाणी प्रश्न पाहता वन विभागाने त्वरीत हस्तक्षेप करून अभयारण्यातील विहिरी ताब्यात घेवून पाण्याचा उपयोग येथील पक्ष्यांसाठी करावा, अशी मागणी नेचर क्लबने केली आहे. दुष्काळी स्थितीत विहिरींतील पाण्याचा वापर हा स्थानिकांसाठी तितकाच महत्वाचा आहे. पक्ष्यांसोबत हा पाणवठा ग्रामस्थांनाही खुला करून देता येईल, याकडे क्लबचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा यांनी लक्ष वेधले.

सध्या बंधाऱ्यात एक थेंबही पाणी शिल्लक नाही. या विहिरीचा उपयोग करून बंधाऱ्यात खड्डे करून छोटी तळी बनवून त्यात पाणी सोडल्यास पक्ष्यांना पाणी देण्याची तात्पुरती व्यवस्था होऊ शकेल. दरम्यान, चापडगाव गावठाण परिसरातील गोदावरी नदीच्या पात्रात २१ पायऱ्यांचे घाट पहावयास मिळत आहे. हा घाट आजवर कोणीच पाहिला नव्हता. त्याचा अभ्यास केला तर इतिहासातील अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी पुढे येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. याबाबत वन्य जीव संरक्षक रामराव यांना निवेदन देण्यात आले असून पुरातत्त्व विभागाशी संपर्क साधण्यात आला आहे.