सुमारे नऊ कोटी रुपये खर्चून अद्ययावत करण्यात आलेल्या महाकवी कालिदास कलामंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानंतर अद्याप कलामंदिरात तांत्रिक बाबींची पूर्तता होणे बाकी असतांना प्रशासनाने कलामंदिराचे दरवाढीचे पत्रक जाहीर केल्याने कलाक्षेत्रासह रसिकही थक्क झाले आहेत. महापालिका प्रशासन भाडेवाढीवर ठाम असले तरी या विषयावर स्थायी समितीची अंतिम मंजुरी मिळणे भाग आहे.

कलामंदिराच्या बिकट अवस्थेविरोधात चोहीकडून ओरड सुरू झाल्यावर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉपरेरेशनने कामाला सुरुवात केली. मुंबई, पुण्याच्या अत्याधुनिक सेवासुविधांनी युक्त अशा नाटय़मंदिरांच्या रांगेत कालिदास कलामंदिर आले. राजकीय श्रेयवादाच्या लढाईत तीन महिन्याहून अधिक काळापासून नाटय़ मंदिराचा उद्घाटन सोहळा रेंगाळला. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्वातंत्र्यदिनी कलामंदिराचे उद्घाटन करत नाटय़ मंदिर प्रेक्षकांसाठी खुले झाल्याचा संदेश दिला. याच कालावधीत शहरातील काही रंगकर्मीनी नाटय़मंदिराच्या प्रकाश तसेच ध्वनी या तांत्रिक बाबींमध्ये काही बदल सुचविले. अन्य काही तक्रारींवर महापौर आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत समिती गठीत करत या तांत्रिक अडचणींचा निपटारा करण्याचे ठरलेले असतांना अचानक एका जाहीर कार्यक्रमात महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कालिदासची दरवाढ जाहीर केली. एरवी चार आकडय़ांमध्ये मिळणाऱ्या कालिदास साठी पाच आकडी रक्कम मोजावी लागणार असल्याने कला क्षेत्रात विशेषत हौशी रंगकर्मीमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

याविषयी अखिल भारतीय नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी महापालिका प्रशासनाने अद्याप आम्हांला वाढीव दरपत्रक दिलेले नसले तरी कार्यक्रमांची नोंदणी वाढीव दराने होत असल्याचे सांगितले. महापालिका प्रशासनाने दरवाढ करतांना हौशी रंगकर्मींचा विचार करण्याचा सल्ला त्यांनी दिला. ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी यांनी कालिदासची दरवाढ अवास्तवच असल्याचे मांडले. महापालिका नागरिकांसाठी पालकत्वाच्या भूमिकेत असतांना रंगकर्मीच्या विशेषत हौशी रंगकर्मीच्या अडचणी समजून घेणे गरजेचे आहे. याशिवाय शहरातील तज्ञ मंडळींनी ध्वनी तसेच प्रकाश योजने संदर्भात काही सूचना केल्या आहेत. त्याचा कोठेही अद्याप विचार झालेला नाही. भाडेवाढमुळे नाटय़प्रयोगांचे दरही वाढत असल्याने याचा बोजा प्रेक्षकांना सहन करावा लागेल. नाटकासाठी शहरात अद्याप कालिदासला सशक्त पर्याय नाही. याचा साकल्याने विचार होणे गरजेचे असल्याचे जोशी यांनी सांगितले.

या सर्व पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन भाडेवाढीवर ठाम असून कलामंदिराच्या देखभालीसाठी भाडेवाढ प्रस्तावित करण्यात आली असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. या प्रस्तावित भाडेवाढीवर शिक्कामोर्तब करावे की नाही, याचा निर्णय स्थायी समितीला घ्यावा लागणार आहे.

नफ्यासाठी नव्हे, भाडेवाढ देखभालीसाठी

कालिदास कलामंदिराची प्रस्तावित भाडेवाढ ही देखभालीसाठी आहे. याव्दारे महापालिकेकडे जमा होणाऱ्या महसुलातून ध्वनी, प्रकाश, वातानुकूलित यंत्रणा आदीची देखभाल होणार आहे. कुठलाही नफा किंवा नूतनीकरणासाठी झालेला खर्च यातून काढला जाणार नाही.  कलामंदिराचे साडेचार हजार रुपये दर हे २००१ च्या आदेशानुसार आहेत. सतरा वर्षांत भाडेवाढ झालेली नाही. देखभालीसाठी येणारा खर्च पाहता ही भाडेवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.

– तुकाराम मुंढे, आयुक्त, नाशिक महापालिका

आम्ही नाटके पाहायची की नाही?

कालिदासच्या नूतनीकरणासाठी साडेनऊ ते दहा कोटी खर्च झाला. नूतनीकरणासाठी कालिदास एक वर्षांपासून बंद होते. नुतनीकरणानंतर कलामंदिरात नवनवीन नाटके येतील, अशी अपेक्षा होती, परंतु भाडेवाढीमुळे व्यावसायिक नाटय़संस्था पाठ फिरवतील अशी भीती आहे. आधीच ५०० रुपये तिकीट असताना भाडेवाढीने हा आकडा वाढेल. यामुळे आम्ही नाटक पाहायचे की नाही? कालिदासचे नूतनीकरण झाले. त्याचा बोजा प्रेक्षकांवर का ?

– यशश्री रहाळकर, गृहिणी