तीन हजार २०३ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार

या शैक्षणिक वर्षांत ११ वीसाठी नाशिक विभागात १५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून त्यात गोंदिया, गडचिरोली, सातारा, सांगलीसह  राज्याच्या इतर भागातील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या प्रक्रियेतील अंतिम टप्प्यात शनिवारी सकाळी ११ वाजता संकेतस्थळावर चौथी अर्थात विशेष फेरीतील प्रवेश जाहीर होणार आहेत.

या फेरीसाठी एकूण तीन हजार २०३ विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार प्रवेश देण्यात येणार असून २९०० विद्यार्थी हे तांत्रिक अडचणींमुळे अद्याप या प्रवेशप्रक्रियेपासून दूर आहेत. जून महिन्यात १० वीचा निकाल लागल्यानंतर ११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली. या प्रक्रियेत जिल्ह्य़ातील ९० पेक्षा अधिक महाविद्यालये सहभागी झाली. या संदर्भात शिक्षण मंडळाने जाहीर केलेले वेळापत्रक दोन वेळ बारगळले असले तरी बहुतांश ठिकाणी ११ वी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून काही ठिकाणी नियमित वर्गही सुरू झाले आहेत. शनिवारी चौथी यादी शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर होईल.

यंदा नेहमीप्रमाणे विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल असला तरी इंग्रजी माध्यमातील वाणिज्य शाखेकडे सर्वाधिक कल राहिल्याने बी.वाय.के. सह के.टी.एच.एम. महाविद्यालयात गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळाला. इंग्रजी माध्यमातील कला शाखेत मोठय़ा प्रमाणावर प्रवेश झाल्याने हं.प्रा.ठा. महाविद्यालयात सध्या अगदीच किरकोळ जागा शिल्लक आहेत. याउलट स्थिती ग्रामीण भागात असून  विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याने कला शाखेसाठी विद्यार्थ्यांची शोध मोहीम सुरू आहे.

चौथ्या विशेष फेरीत सात हजार ६०० जागा रिक्त असून तीन हजार २०३ विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार जागा जाहीर झाल्या आहेत. उर्वरित ४३९७ विद्यार्थ्यांपैकी दोन हजार ९०० विद्यार्थी हे आपल्या आवडीचे महाविद्यालय हवे यासाठी अट्टहास करत असल्याने तसेच अर्जात पसंतीक्रम म्हणून केवळ एकाच महाविद्यालयाची निवड केल्याने संबंधित विद्यार्थी प्रवेशापासून दूर आहेत. उरलेल्या विद्यार्थ्यांनी अन्य व्यावसायिक शाखांमध्ये प्रवेश निश्चित केले आहेत. दरम्यान, चौथ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांच्या पहिल्या १० पसंतीक्रमानुसार कला शाखा (३५०), वाणिज्य (१०५९), किमान कौशल्य (१२३) आणि विज्ञान (१६७१) एकूण तीन हजार २०३ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी २१ ऑगस्टपर्यंत आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.