लोकवर्गणीतून निधी आणि आर्थिकदृष्टय़ा दुर्बल संस्थांकडून सहकार्याबाबत साशंकता

नाशिक : महाराष्ट्राचे वैभव असलेल्या सह्य़ाद्रीच्या कुशीत वसलेल्या गड-किल्ल्यांमध्ये पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनण्याची क्षमता आहे. त्यांचे संवर्धन करण्याची सातत्याने मागणी करणाऱ्या संस्थांनाच त्याची जबाबदारी देण्याची तयारी शासनाने दर्शविली आहे. संवर्धनासाठी आर्थिक निधीचा मार्ग म्हणून  लोकवर्गणीतून किती निधी उभा राहील आणि आर्थिकदृष्टय़ा सक्षम नसलेल्या दुर्गसंवर्धन करणाऱ्या संस्था कितपत हातभार लावू शकतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दुर्गसंवर्धनासाठी उत्सुक असलेल्या सामाजिक संस्था तसेच काही पर्यावरण, इतिहासप्रेमींकडून श्रमदान मोहिमेच्या माध्यमातून गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

या ठिकाणी काही बदल करावयाचे असल्यास संस्थांना तसे अधिकार नाहीत. याच पाश्र्वभूमीवर नुकताच पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने राज्यातील गड-किल्ले आणि इतर राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन, दुरुस्ती आणि संवर्धनाची कामे पुरातत्त्वीय संकेतानुसार तसेच गडसंवर्धन समितीच्या शिफारशींनुसार सामाजिक संस्था, व्यक्ती यांच्या मदतीने करण्याचे जाहीर करण्यात आले. या कामासाठी लोकसहभागातून, लोकवर्गणीतून ही कामे कंत्राटदाराकडून करून घेण्याचे सांगण्यात आले आहे.  अल्प कालावधीसाठी किरकोळ डागडुजी तसेच प्रसाधनगृहाची उभारणी या ठिकाणी करण्यात यावी, ज्या संस्था हे काम करतील त्यांनी वर्षभरासाठी त्या प्रकल्पाची जबाबदारी घ्यावी, अशा काही सूचना यामध्ये करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील गड-किल्ले, स्मारके यांचा कायापालट होण्यास मदत होईल. यामध्ये धोडप, रामशेजसह काही दुर्लक्षित किल्ले दुरवस्थेत आहेत. तेथे किमान दैनंदिन स्वच्छतेसह स्वच्छतागृह, अन्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.

सुंदर नारायण मंदिरासाठी प्रयत्नशील

कित्येक दिवसांपासून काही स्वयंसेवी संस्था, व्यक्तींकडून गड, किल्ले, स्मारके या ठिकाणी काही काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी होती. यासाठी निधी देण्याची त्यांची तयारी आहे. स्वयंसेवी संस्था, व्यक्तींच्या या मागणीचा विचार करून हा निर्णय झाला आहे. लोकसहभागातून ही कामे होणार असली तरी पुरातत्त्व विभाग यावर देखरेख ठेवून असेल. या ठिकाणी शौचालयासह अन्य सेवा- सुविधा देणे अपेक्षित आहे. नाशिकमधून सुंदर नारायण मंदिराचा कायापालट व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जास्तीत जास्त संस्थांपर्यंत कसे पोहोचता येईल, यासाठी नियोजन सुरू आहे.

 – डॉ. तेजस गर्गे  (पुरातत्त्व वस्तुसंग्रहालयाचे संचालक)

पैसा कोठून आणणार

गड, किल्ले, स्मारके येथे पर्यटकांपेक्षा इतिहासप्रेमी, गड-किल्ल्यांची आवड असणाऱ्या व्यक्ती जातात. या ठिकाणांची माहिती आणि अभ्यास दुर्गसंवर्धनासाठी उत्सुक असलेल्या व्यक्तींचा जास्त राबता आहे. त्या दृष्टीने वेगवेगळ्या श्रमदान मोहिमेतून तेथे संवर्धनाच्या दृष्टीने छोटी-मोठी कामे सुरू असतात. कामांसाठी आवश्यक असणारा पैसा गडसंवर्धन करणाऱ्या संस्थांकडे नाही. बोटावर मोजण्याइतक्या संस्था यासाठी सक्षम आहेत. नाशिकसह उत्तर महाराष्ट्र त्या दृष्टीने दुर्लक्षित आहे. नोंदणीकृत संस्था असल्या तरी औद्योगिक किंवा कोणतीही व्यक्ती अशा गड, किल्ल्यांसाठी काम करणाऱ्या संस्थांना मदत करत नाही. हा सर्व डोलारा संस्थेच्या स्वत जमवलेल्या, खर्च केलेल्या पैशांवर आधारित आहे. गडसंवर्धनासाठी संस्था, समाज, सरकार आर्थिक मदत करत नाही. यामुळे सरकारचा या निर्णयाचे स्वागत असले तरी दुरुस्तीसाठी पैसे आणायचे कोठून?  संवर्धनाचे काम पुरातत्त्व, वन विभागासह अन्य काही आस्थापनांचे असताना संबंधित विभाग यातून बाजूला होण्याचा प्रयत्न करत आहे.

– राम खुर्दळ,  शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था