News Flash

संचालकांच्या मालमत्ता विकून पैसे द्या

समृद्धी जीवन गुंतवणूकदारांचा मूक मोर्चा

नाशिक येथे काढण्यात आलेल्या मूक मोर्चात सहभागी झालेले गुंतवणूकदार.

समृद्धी जीवन गुंतवणूकदारांचा मूक मोर्चा

समृद्धी जीवन मल्टी स्टेट मल्टी परपज सहकारी सोसायटी आणि पुणेस्थित समृद्ध जीवन फुड्स इंडिया यांची मालमत्ता विकून गुंतवणूकदार, सभासदांना पैसे परत करावेत, या मागणीसाठी सोमवारी समृद्ध जीवन गुंतवणूकदार बचाव समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. बहुतेकांनी काळे वस्त्र परिधान करत तोंडाला काळी पट्टी लावत आपला निषेध नोंदवला.

समृद्धी जीवनच्या राज्यभरात विविध शाखा आहेत. महेश मोतेवार, त्यांच्या अन्य सहकाऱ्यांची ही समृद्धी जीवन संस्था डबघाईस आल्याने सेवानिवृत्त, नोकरदार, महिला आदींना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. नाशिक जिल्ह्यात संस्थेचे एक लाखहून अधिक गुंतवणूकदार, सभासद असल्याने कोटय़वधींच्या ठेवी यामध्ये अडकल्या आहेत.

या संदर्भात सुषमा बच्छाव यांनी आपली व्यथा मांडली. बाजुला ठेवलेले काही पैसे गुंतवणूक म्हणून समृद्धीत गुंतवले. पण संस्था डबघाईस आल्याने पैसे अडकले. पैशांअभावी मुलांना शिक्षण अर्धवट ठेवावे लागले. आजारपणाचा प्रश्न असून दैनंदिन खर्च भागविणे अवघड झाल्याचे त्यांनी नमूद केले. कैलास पाटील यांनी बहुतांश गुंतवणूकदारांनी आपली सर्व जमा पुंजी गुंतविल्याचे नमूद केले. सेवा निवृत्तिवेतनाचा पैसाही कंपनीत अडकला आहे. त्यामुळे आजारपण, लग्नकार्य, शिक्षण अशी सर्वच कामे अडकली असून मुला-मुलींची लग्न मोडण्यापर्यंत, आर्थिक विवंचनेमुळे घटस्फोट घेण्यापर्यंत बिकट स्थिती ओढावल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत मागील अधिवेशनात मुख्यमंत्र्यासमोर हा मुद्दा मांडला होता. त्या वेळी संचालकांची मालमत्ता जप्त करत त्यांचा लिलाव करत गुंतवणूकदारांचे पैसे परत करावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी करूनही या प्रकरणी कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी रावसाहेब पवार, पुनम अमृतकर, कैलास आठभाई आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत वरिष्ठ पातळीवर या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. मोर्चात हजारहून अधिक सदस्य, सभासद, गुंतवणूकदार सहभागी झाले होते.

मोकाट संचालकांवर कारवाई करावी

मोर्चेकऱ्यांनी जिल्ह्यातील संस्थेची कार्यालयांची विक्री करावी, त्या मालमत्तेचे पैसे गुंतवणूकदारांना द्यावे, काही मालमत्ता पूर्वीच्या संस्था चालकांच्या नावे असून त्याही जप्त कराव्यात, संचालक, व्यवस्थापनावरील अन्य सदस्य मोकाट असून त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करावी, अशी मागणी करत संस्थाचालक कारागृहात असतांनाही नातेवाईकांमार्फत वेगवेगळ्या नावाने कंपनी स्थापून नागरिकांना लुटण्याचे प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप मोर्चेकऱ्यांनी केला. सरकारने हे प्रकार थांबवावेत, अशी मागणी करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 1:29 am

Web Title: financial scam by samruddha jeevan foods india ltd
Next Stories
1 साडेचौतीस हजारपैकी केवळ ५०६ जणांना कर्जमाफी
2 मतदान यंत्रांमधील करामतच गुजरातमध्ये भाजपला वाचवेल
3 शैक्षणिक संस्थांच्या पन्नास शाळा असल्यास स्वायत्तता
Just Now!
X