अ‍ॅक्सिस बँक वसुली करणार

आयुष्यात श्रीमंत होण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी काहींची फारसे कष्ट न घेता ते पूर्ण करण्याची इच्छा असते. मात्र अचानक मिळालेली ही ‘श्रीमंती’ कशी अल्पायुषी ठरते याचा प्रत्यय आणणारा प्रकार सिडको परिसरात घडला. येथील अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएम केंद्रामधून इच्छित पैशापेक्षा पाचपट पैसे मिळत असल्याची माहिती मिळाल्यावर ग्राहकांनी केंद्रावर गर्दी केली. काहींना ते पैसे मिळालेही. परंतु हा प्रकार काही तांत्रिक दोषामुळे घडल्याने पाच पट मिळालेली रक्कम ग्राहकांना पुन्हा बँकेला द्यावी लागणार आहे.

सिडकोतील विजयनगर येथे अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम केंद्र आहे. बँकेने एटीएम यंत्रात दुपारी चार वाजता पाच लाख रुपये भरले होते. सायंकाळी या यंत्रात तांत्रिक अडचण निर्माण झाली. एखाद्या ग्राहकाला जी रक्कम हवी आहे, तो आकडा त्याने टाकल्यावर थेट पाचपट पैसे यंत्रातून बाहेर पडू लागले. एका ग्राहकाला दोन हजार रुपये काढायचे होते, त्याला १० हजार रुपये मिळाले. याची माहिती कर्णोपकर्णी पसरली आणि नागरिकांची पावले या एटीएम केंद्राकडे वळली. या घटनाक्रमाबद्दल अनभिज्ञ असणारे ग्राहक संजय गोलाईत हे एटीएममधून चार हजार रुपये काढण्यासाठी आले होते. त्यांनी ही रक्कम टाकल्यावर २० हजार रुपये हाती पडले. यंत्रात दोष असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी या घटनेची माहिती बँकेला दिल्यावर बँक अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. दरम्यानच्या काळात एटीएममधून पाचपट रक्कम मिळत असल्याने पैसे काढण्यासाठी गर्दी झाली होती. बँकेने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. अंबड पोलिसांनी धाव घेतली. बँकेने हे एटीएम केंद्र बंद केले. चार तासात एटीएम यंत्रातून दोन लाखाहून अधिकची रक्कम काढली गेल्याचा अंदाज आहे. म्हणजे ग्राहकांनी यंत्रातून काढण्यासाठी टाकलेल्या मूळ रकमेचा आकडा अतिशय कमी असू शकते.

पाचपट पैसे यंत्रातून बाहेर येत असताना एका ग्राहकाचा अपवाद वगळता कोणीही बँकेला ही माहिती कळविण्याची तसदी घेतली नाही. उलट, आपल्या आप्तांना, मित्रांना माहिती देऊन रक्कम काढण्यास प्रोत्साहित केल्याचे दिसून येते. उपरोक्त काळात पाचपट पैसे हाती पडणारे ग्राहक अल्पकाळासाठी श्रीमंत झाले. अधिकचे मिळालेले पैसे त्यांना बँकेला परत करावे लागतील. या वसुलीत अडथळे आणल्यास बँक कायदेशीर कारवाईचा विचार करू शकते, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

उपरोक्त घटनेबद्दल बँकेने पोलिसात अद्याप कोणतीही तक्रार केली नसल्याचे अंबड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी सांगितले. तांत्रिक दोषामुळे तो प्रकार घडल्याचे त्यांनी नमूद केले. आता बँकेसमोर ज्या ग्राहकांनी उपरोक्त काळात रक्कम काढली त्यांच्याकडून वसुलीचे आव्हान आहे.

वाहत्या गंगेत हात धुण्याचा प्रकार

उपरोक्त काळात ज्या ग्राहकांनी रक्कम काढली, त्यांची संगणकीय नोंद झालेली आहे. एटीएम केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरा कार्यान्वित आहे. ज्या खात्यांवरून रक्कम काढण्यात आली, त्यांची माहिती घेऊन रक्कम वसूल केली जाणार असल्याचे बँक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. पाचपट रक्कम मिळत असल्याची माहिती समजल्यावर पैसे काढण्याची धडपड करणारे सुशिक्षित ग्राहक आहेत. स्वयंचलित प्रणालीवर कार्यरत यंत्रणेत प्रत्येक व्यवहाराची नोंद होते, याची जाणीव त्यांना राहिली नाही. अधिकची रक्कम मिळतेय म्हणून अनेकांनी आपल्या खात्यातून काही रक्कम काढली. यंत्रातून पाचपट रक्कम हाती पडली म्हणजे झालो श्रीमंत, असा बहुदा त्यांचा समज झाला. वाहत्या गंगेत हात धुण्याचा हा प्रकार असल्याचे दिसून येते.