न्यायालयाचे श्री ज्योतीविरुद्ध चौकशीचे निर्देश

श्री ज्योती बुक सेलर्स अ‍ॅण्ड स्टेशनर्स कंपनीच्या मुदत ठेव योजनेत गुंतविलेली रक्कम आणि व्याज देण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारीची पोलिसांनी सखोल चौकशी करून त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हा न्यायालयाने दिले आहेत. या संदर्भात गुंतवणूकदार महिलेने आधी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती; परंतु त्यावर कारवाई होत नसल्याने संबंधिताने न्यायालयात दाद मागितली.

स्नेहल वैद्य यांनी बँकेच्या व्याजदरापेक्षा अधिक व्याज मिळणार असल्याने उपरोक्त कंपनीच्या गुंतवणूक ठेव योजनेत दोन लाख रुपये एक वर्षांच्या कालावधीसाठी गुंतविले होते. कंपनीचे संचालक ज्योतीराव खैरनार यांनी पहिल्या वर्षी पूर्ण व्याज दिले. मुदत संपुष्टात आल्यानंतर मुद्दल रकमेची मागणी केली असता संचालकांनी मोठय़ा ऑर्डर मिळाल्याने व्यवसायवृद्धीसाठी भांडवलाची आवश्यकता असल्याचे सांगत ही गुंतवणूक आणखी वर्षभरासाठी कायम ठेवावी, त्यावर कंपनी १२ टक्के व्याज देईल, असे सांगितल्याचे वैद्य यांनी नमूद केले. संचालकांचा शहरात नावलौकिक असल्याने आपण ही रक्कम पुन्हा कंपनीत गुंतविली. पुढील काळात कंपनीने व्याजाची रक्कम देणे बंद केले. व्याजाची रक्कम मुदत पूर्ण होण्याच्या वेळी दिली जाईल, असे सांगितले गेले. नंतर संचालकांनी सध्या आर्थिक मंदी असल्याने रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगून एक धनादेश दिला. त्यावर हा धनादेश वटविण्यास टाकू नये असे लिहिले. कंपनीच्या संचालकांकडे पैशांची मागणी केली असता संबंधितांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. यामुळे आम्ही धनादेश वटविण्यास टाकला असता तो वटला नाही. ठरावीक तारखेपर्यंत गुंतविलेल्या रकमेवरील व्याज देतो, मुद्दल नंतर देतो, सध्या पैसे नाहीत, व्यवसायात मंदी आहे अशी अनेक कारणे सांगून घेतलेली रक्कम देण्यास टाळाटाळ केली गेल्याचे वैद्य यांनी सांगितले.

कंपनीच्या संचालकांनी आजवर दिलेली आश्वासने कधीही पाळली नाही. सामान्य गुंतवणूकदारांना वेठीस धरून त्यांना बँक व्याजापेक्षा अधिक व्याजाचे आमिष दाखवून जमा केलेल्या रकमेची परतफेड न करता अपहार केल्याची तक्रार वैद्य यांनी वकिलामार्फत न्यायालयासमोर मांडली. या कंपनीला अशी योजना तयार करून पैसे स्वीकारण्याची कोणतीही परवानगी नव्हती. यामुळे कंपनीने आम्हाला अंधारात ठेवत हा व्यवसाय बेकायदेशीररीत्या करत फसवणूक केल्याची तक्रार गुंतवणूकदाराने केली आहे. संबंधितांचे म्हणणे जाणून घेत न्यायालयाने सरकारवाडा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी, असे निर्देश दिले आहेत. फौजदारी प्रक्रिया संहिता कलमान्वये तपास करण्याचे सूचित करण्यात आले आहे.

लवकरच पैसे देणार

वैयक्तिक संबंधातून पैसे घेतले होते. आमचा पुस्तकांचा व्यवसाय आहे. त्यात नुकसान झाल्याने पैसे देता आले नाही. सर्वाना पैसे देण्याचे कबूल केले आहे. पुढील आठवडय़ात चार ते पाच गुंतवणूकदारांचे पैसे देण्यात येतील. उर्वरित गुंतवणूकदारांची रक्कम दिवाळीच्या आधी परत केली जाईल.  ज्योतिराव खैरनार (संचालक, श्री ज्योती बुक सेलर्स अ‍ॅण्ड स्टेशनर्स)