29 September 2020

News Flash

आगीतून कुटुंबीयांना वाचविण्यात यश

दुकानाची देखभाल करण्यासाठी त्यांचे काही नातेवाईक दुकानाच्या वरील मजल्यावर राहतात.

सिन्नर येथे कपडय़ाच्या दालनास लागलेली आग विझविताना अग्निशमन दलाचे कर्मचारी.

सिन्नरमधील थरारक घटना; अग्निशमन दल, सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांची प्राणांची बाजी
सिन्नर येथील गणेश पेठेत असलेल्या एका कपडय़ांच्या दालनास बुधवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत लाखो रुपयांचा माल भस्मसात झाला. खालच्या मजल्यावर आग पसरली असताना वरच्या मजल्यावर दाम्पत्यासह दोन लहान मुले अडकली होती. शेजारील इमारतीवरून शिडी लावून संबंधितांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात अग्निशमन दल, पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांना यश आले.
गणेश पेठ या गजबजलेल्या भागात सुरेंद्र कुमार शर्मा यांच्या मालकीचे राधाकृष्ण टेक्सटाइल्स हे तीन मजली दालन आहे. दुकानाची देखभाल करण्यासाठी त्यांचे काही नातेवाईक दुकानाच्या वरील मजल्यावर राहतात. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे मुख्य इमारतीच्या मागील व पुढील बाजूला असणाऱ्या लोखंडी दरवाजांना कुलूप लावून त्याच्या चाव्या खालील टेबलात ठेवण्यात आल्या. बुधवारी पहाटेच्या सुमारास या दालनास अचानक आग लागली. सर्वत्र कापड, साडय़ा, तयार कपडे आणि गाद्या आदी सामान असल्याने काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले.
आगीची जाणीव होताच वरील भागात असणाऱ्या दाम्पत्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. आगीची तीव्रता वाढत असल्याने चाव्या काढणे त्यांना शक्य नव्हते. दालनालगत मनोज भंडारी यांच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. झोपेत असणाऱ्यांपर्यंत दाम्पत्याचा आवाज फारसा पोहचू शकला नाही. हा प्रकार लक्षात यावा म्हणून त्यांनी खिडकीतून घरातील साहित्य शेजारील इमारतीच्या छतावर फेकण्यास सुरुवात केली.
भंडारी यांना आवाजामुळे चोर आले असा समज झाल्याने त्यांनी इतरांना जागे करत काठय़ा घेऊन ते बाहेर पडले असता समोर आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच नगरपालिकेच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधला. अग्निशमन दलाच्या पथकाला लोखंडी दरवाजामुळे कामात अडसर येत होता. दरम्यानच्या काळात आ. राजाभाऊ वाजे व इतर नगरसेवक घटनास्थळी दाखल झाले. काही सामाजिक कार्यकर्ते व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने लोखंडी दरवाजा हत्याराने कापत आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
दुसरीकडे, तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू राहिले. भंडारी यांच्या तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून इमारतीच्या दिशेने शिडी लावत पथकाने दाम्पत्य आणि त्यांच्या लहान मुलांना सुखरूप बाहेर काढले. त्यांना किरकोळ जखमा झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दालनाची इमारत आरसीसीत असल्याने आग इमारतीच्या बाहेर न पसरता आतच राहिली. आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत दालनातील संपूर्ण साहित्य भस्मसात झाले. या कालावधीत नगरपालिकेच्या बंबाने तीन फेऱ्या मारल्या, तर नाशिक नगरपालिकेच्या दोन बंबांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. बघ्यांची मोठी गर्दी जमल्याने मदतकार्यात अडथळे आले.प्राणांची बाजी लावून कपडे दुकान मालकाच्या कुटुंबीयांचे जीव वाचवल्यावरून शहरात कौतुक होत आहे. अनेक दुर्घटनांमध्ये आगीत अडकलेल्यांना बाहेर काढण्यात अपयश येते. त्यामुळे काही प्रसंगी प्राण गमवावे लागतात.
तर काही प्रसंगी जखमी होण्याचे प्रकार घडतात; या दुर्घटनेत अग्निशमन दलाच्या जवानांना येथील स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मदत केली. त्यामुळे प्राण वाचू शकले, असे एका अधिकाऱ्याने लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2016 2:19 am

Web Title: fire brigade save family from fire
Next Stories
1 मातंग संघाच्या मोर्चामुळे वाहतूक ठप्प
2 ‘मीडियावर बोलू काही’द्वारे माध्यमजागृतीची प्रचिती
3 महाराष्ट्र पोलीस अकादमीत आज केळकर स्मृती व्याख्यान
Just Now!
X