अग्निशमन दलासमोर नवीन आव्हान

मंगळवारी दर मिनिटाला पुरात अडकलो.. कुठल्या सुरक्षित रस्त्याने घरी जाता येईल.. पावसाचे पाणी थेट घरात शिरले..  धरणातून विसर्ग किती आहे.. यासह असंख्य प्रश्नांचा भडिमार सहन करणाऱ्या अग्निशमन विभागासह आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचा खणाणणारा दूरध्वनी बुधवारी तुलनेत शांत राहिला.

पावसामुळे सर्वत्र गाळ साचला, पाणी तुंबले या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी प्रशासन पातळीवर ‘पाणी उपसा, गाळ काढणे’ हा एककलमी कार्यक्रम दिवसभर सुरू राहिला.

जोरदार पावसाने यंत्रणेचा मदत कार्यासाठी कस लागलेला असताना यंत्रणेची भिस्त अग्निशमन विभाग व आपत्कालीन कक्षावर राहिली. या दोन्ही विभागांना मदत कार्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. बुधवारी तुलनेत नियमित काम सुरू असताना अग्निशमन विभागाने ‘पाणी उपसा’ हा एक कलमी कार्यक्रम आपापल्या विभागात राबविला. पंचवटी, नाशिकरोड, सिडको, सातपूर आदी ठिकाणी परिसरातील बहुतांश इमारतीच्या तळ मजल्यात तसेच नदीकिनारी असलेल्या बैठी घरे, चौकाचौकांत जमा झालेला गाळ काढण्याचे काम सुरू होते. इमारतीच्या तळ मजल्यातील पाणी मोटार लावून बाहेर काढण्यात आले. गाळ उपसाही करण्यात आला. गंगापूर रस्त्यावरील खतिब डेअरीच्या मागील बाजूस पावसाचे पाणी वाहून जावे यासाठी इमारतीतील रहिवाशांनी संरक्षक भिंत तोडली.

गंगापूर रोड, महात्मा नगर, सातपूर, सिडको या ठिकाणी मोठी वृक्षे उन्मळून पडली, तर काही ठिकाणी झाडाच्या फांद्या झाडापासून वेगळ्या होत लटकत होत्या. ही झाडे बाजूला काढणे व फांद्या छाटणीची कामे अग्निशमन विभागाला करावी लागली.

सातपूर येथील बुद्धविहार, नाशिकरोड येथील विशाल मॉल, पंचवटी परिसरातील मखमलाबाद नाका, हनुमानवाडी, सिडको येथे उंटवाडी पुलालगतच्या काही इमारतीतून पंपांच्या सहायाने पाणी काढण्यात आले. नाशिकरोड येथील रोकडोबावाडी परिसरात वालदेवी नदीला आलेला पूर पाहण्यासाठी गेलेले सुभाष थोरात हे पुरात वाहून गेले. त्याचा शोध घेण्यासाठी सकाळपासूनच पथक घटनास्थळी रवाना झाले. मात्र दुपापर्यंत त्याचा शोध लागला नाही.

शहरातील बहुतांश पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये पावसाचे पाणी मिसळल्याने दूषित पाणी नळाद्वारे येण्यास सुरुवात झाली आहे. पंचवटी विभागाकडून पाण्याच्या टाक्यांतून उपसा करण्यात आला.