पोलीस वसाहतीतील घटना

शहरातील पोलीस मुख्यालयातील इमारतीत एका बंद घरास लागलेल्या आगीत टीव्ही, फ्रिजसह संसारोपयागी साहित्य जळून भस्मसात झाले. तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन विभागाने एक तासाच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळविले.

गंगापूर रस्त्यावर मुख्यालयाजवळ पोलिसांची वसाहत आहे. इमारत क्रमांक १४ मधील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या एन. एन. करोडवाल यांच्या सदनिकेत ही आग लागली. दुपारी घरात आग लागली तेव्हा ती बंद होती. तिची धग बाहेर जाणवेपर्यंत घरातील बहुतांश साहित्य आगीच्या विळख्यात सापडले होते. परिसरातील रहिवाशांना घरातून धूर येत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी अग्निशमन दलाला माहिती दिली.

मुख्यालयातून एक आणि पंचवटी केंद्रातून एक असे पाण्याचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. घरातून धुराचे लोळ बाहेर येत होते. सदनिका तिसऱ्या मजल्यावर असल्याने अग्निशमन दलास आग विझविण्यासाठी कसरत करावी लागली. आग आटोक्यात येईपर्यंत मुख्य दरवाजासह टीव्ही, फ्रिज, पंखे, वायरिंग भस्मसात झाल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. आगीतून दोन सिलिंडर बचावली. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी ही सिलिंडर घराबाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

बंद मार्गामुळे बंबाला अडसर

पोलीस मुख्यालयातील वसाहतीत जाण्यासाठी गंगापूर रस्त्यावरून दोन मार्ग आहेत. त्यातील सरकारवाडा पोलीस ठाण्यालगतचा मार्ग लोखंडी जाळ्या लावून बंद करण्यात आला आहे. आग विझविण्यासाठी आलेल्या अग्निशमनच्या एका बंबाला आतमध्ये जाण्यासाठी या जाळ्या अडथळा ठरल्याचे पाहावयास मिळाले. ज्या सदनिकेला आग लागली, ती या मार्गाच्या समीप होती. अग्निशमन दलाची गाडी या ठिकाणी जाऊन धडकली, परंतु लोखंडी जाळ्यामुळे ती तातडीने आतमध्ये जाऊ शकली नसल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. स्थानिक युवकांनी धाव घेऊन लोखंडी जाळ्या हटविल्यानंतर अग्निशमन दलाची गाडी आतमध्ये पोहोचली. दरम्यानच्या काळात मुख्यालयातून अन्य बंब दुसऱ्या मार्गाने घटनास्थळी पोहोचला होता, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.