संतापलेल्या पतीने पत्नीसह तिच्या मित्रावर गावठी कट्टय़ातून गोळीबार केल्याची घटना गुरूवारी रात्री पाथर्डी परिसरातील साईराम रो हाऊस येथे घडल्याने खळबळ उडाली आहे. गोळीबारात जखमी झालेल्यांची प्रकृती स्थिर आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी संशयित पतीला अटक केली तर जखमी पत्नी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. या घटनाक्रमात २० दिवसांचे बाळ आणि लहानग्या मुलीची फरफट झाली.

गोळीबारात कोमल दीपक परदेशी आणि नागेश्वर बंगाली ठाकूर हे जखमी झाले. कोमल आणि दीपक परदेशी (नंदुरबार) यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. संबंधितांना २० दिवसांचे बाळ आहे. कोमलचे हे दुसरे लग्न. तिला पहिल्या पतीपासून पाच वर्षांची मुलगी आहे. दीपक नंदुरबार येथे कुक्कटपालनाचा व्यवसाय करतो.  दीड-दोन महिन्यांपूर्वी ते पाथर्डी परिसरातील साईराम रो हाऊस येथे रहावयास आले होते. दीपक नंदुरबारहून ये-जा करत असे. पत्नीच्या मित्रांना त्याचा विरोध होता. या कारणावरून संबंधितांमध्ये वाद होत असल्याचे सांगितले जाते. गुरूवारी रात्री संबंधितांच्या घरी वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी नागेश्वर ठाकूर कोमल यांना भेटावयास आला. यामुळे संतापलेल्या दीपकने गावठी कट्टय़ातून पत्नी व तिच्या मित्रावर गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकून स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सदानंद इनामदार व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. गोळीबारात जखमी झालेल्या दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याच्याविरुध्द इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घडामोडीत बाळ आणि पाच वर्षीय मुलीची फरफट झाली. आईची प्रकृती धोक्याबाहेर असल्याने आणि बाळ अतिशय लहान असल्याने बाळ व मुलीला जखमी आईकडे दवाखान्यात नेण्यात आले. चारित्र्याच्या संशयावरून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शुक्रवारी दीपकला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.