परीक्षणाकडे महापालिका क्षेत्रातील चार हजार इमारतींची पाठ

आगीपासून होणारी जीवित आणि वित्तीय हानी टाळण्यासाठी कायद्यानुसार अग्नी सुरक्षा परीक्षण बंधनकारक असले तरी महापालिका क्षेत्रातील तब्बल साडे तीन ते चार हजार इमारतींनी हे परीक्षण केले नसल्याचे फायर अ‍ॅण्ड सिक्युरिटी असोसिएशनच्या नाशिक शाखेने उघड केले आहे. त्यात वाणिज्यिक आणि निवासी इमारतींचा अंतर्भाव आहे. या संदर्भात अशा इमारतींना महापालिकेने नोटिसा बजावल्या. आजवर अनेकदा नोटीस बजावूनही त्यास प्रतिसाद मिळत नाही. अग्निशमन दलाच्या कार्यपध्दतीवर अनेकांना आक्षेप आहे.

अलीकडेच मुंबईत घडलेल्या आगीच्या दुर्घटनेत अनेकांना प्राण गमवावे लागले. त्यानंतर शासन, महापालिकांना जाग आली. मुंबईतील घटनेआधी नाशिकमध्ये निवासी इमारत, पालिका व्यापारी संकूल आदी ठिकाणी आगीच्या दुर्घटना घडल्या. प्रत्येक इमारतीचे आग सुरक्षा परीक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या निवासी इमारती १५ मीटरपेक्षा उंच आहेत, ज्या इमारतींचा  वापर वाणिज्यिक कारणास्तव होत आहे, अशा सर्व इमारतींना हे परीक्षण करणे बंधनकारक आहे. त्यात शासकीय-खासगी रुग्णालये, कार्यालये, हॉटेल, लॉज, शैक्षणिक इमारती (बहुमजली शाळा, महाविद्यालये), व्यापारी संकुल आदींचा समावेश आहे. नव्याने बांधल्या जाणाऱ्या इमारतीत आग सुरक्षा प्रतिबंधक उपाय केले जातात. ही इमारत बांधकाम व्यावसायिकाकडून पुढे हस्तांतरित केली जाते, तेव्हा पुढील काळात त्याकडे दुर्लक्ष केले जाते. म्हणजे हे परीक्षण न करणाऱ्यांत आधिक्याने जुन्या इमारती आहेत.

आग प्रतिबंधकात्मक उपायांसाठी नियमित परीक्षण गरजेचे आहे. मुंबईसारखी घटना नाशिकमध्ये घडू नये म्हणून संघटनेने याकरिता पुढाकार घेतल्याचे सहसचिव जितेंद्र कोतवाल यांनी नमूद केले. या परीक्षणासाठी बांधकाम विभागाने सहा रुपये प्रति चौरस मीटर दर जाहीर केले आहेत. या विषयावर जनजागृती होण्याकरिता संघटना पहिल्या वर्षी मोफत परीक्षण करणार आहे. याकरिता इच्छुक इमारतधारकांना ऑनलाईन नोंदणी करता येईल.

या परीक्षणात अग्नि सुरक्षा उपकरणांची स्थिती, इमारत मंजूर आराखडय़ाप्रमाणे आहे की नाही, वापरातील बदल, परवानगी आदींची तपासणी होईल. या त्रुटींसह सुरक्षेसाठी करावयाच्या उपाययोजना याचा अहवाल इमारतधारक, अग्निशमन दलास सादर केला जाणार आहे.

सद्यस्थितीत महापालिका क्षेत्रात असे परीक्षण झालेल्या इमारतींची संख्या केवळ १० टक्के इतकीच आहे. सुमारे साडेतीन ते चार हजार इमारतींचे आग सुरक्षा परीक्षण झाले नसल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.या पाश्र्वभूमीवर, फायर अ‍ॅण्ड सिक्युरिटी असोसिएशनने शहरातील इमारतींचे आग सुरक्षा प्रतिबंधक परीक्षण मोफत करण्याचे जाहीर केले आहे. या परीक्षणाचा अहवाल अग्निशमन दलास पाठविला जाईल. ११ शासकीय मान्यताप्राप्त संस्था हे काम करतील. त्यात अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांशी संबंधित काही संस्थांचा समावेश असला तरी, त्याविषयी संघटनेने मौन बाळगले आहे.

मोफत परीक्षणानंतरच्या शुक्लकाष्ठाची चर्चा

आग सुरक्षा परीक्षण किंवा नवीन इमारतीत या संदर्भातील प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अग्निशमन दल विशिष्ट संस्थेकडून अग्नी सुरक्षेची उपकरणे खरेदी करण्याचा आग्रह धरते असा आक्षेप आहे. या संस्था अग्निशमन अधिकाऱ्यांशी संबंधित आहेत. या संस्थांकडून उपकरणांची खरेदी न केल्यास प्रमाणपत्र मिळणार नसल्याचे सांगितले जाते. अग्निशमन दलाच्या कार्यशैलीवर रुग्णालय चालक डॉक्टरांसह अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. आग सुरक्षा परीक्षणात अग्निशमन दलाशी निगडीत अधिकाऱ्यांच्या संस्था किती, या प्रश्नावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला. अग्निशमन दलास कार्यशैलीमुळे अनेक इमारतधारक जुमानत नाहीत. मोफत परीक्षणाचा अहवाल अग्निशमन दलास दिला जाणार आहे. यामुळे त्यानुसार कारवाई न करणाऱ्यामागे नवीन शुक्लकाष्ठ लागण्याची शक्यता आहे. यामुळे इमारतधारक मोफत परीक्षणास तयार होतील की नाही, याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे.