पाच ते दहा हजाराच्या माळांनी उडविलेली धूम.. म्युझिकल क्रॅकर, ब्रेक व पिकॉक डान्ससारख्या फॅन्सी प्रकारांनी अधोरेखित केलेले वेगळेपण.. एवढेच नव्हे तर, सिग्नल लाइट, कलर फ्लॅश, माईन ऑफ क्रॅकर, ट्रिपल फन, सिंगिंग बर्ड अशा फटाक्यांची चाललेली आतषबाजी.. बुधवारी सायंकाळी लक्ष्मीपूजन झाल्यावर आसमंत असे विविधरंगी फटाक्यांनी उजळून निघाले अन् प्रकाशोत्सवातील लखलखीतपणा खऱ्या अर्थाने अनुभवयास मिळाला.
यंदा दिवाळी सहा दिवस असल्याने लहानथोरांपासून सर्व जणांना तिचा मनमुराद आनंद घेणे शक्य झाले. तेजाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपोत्सवाला लक्ष्मीपूजनाने वेगळाच आयाम प्राप्त झाला. भल्या पहाटेपासून सर्वाची लगबग सुरू झाली. ग्राहकांनी फुललेली बाजारपेठेतील गर्दी दुपारनंतर हळूहळू ओसरू लागली. व्यापारी व व्यावसायिकांसाठी लक्ष्मीपूजनाचे सर्वाधिक महत्त्व. त्याची जय्यत तयारी त्यांनी आधीच करून ठेवलेली होती. सकाळपासून फुलांनी सजविलेली दुकाने सायंकाळी दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाली. वर्षभराचा जमा-खर्च मांडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खतावण्या, चोपडय़ा यांच्याबरोबर धनाचे विधीवत पूजन करण्यात आले. कारखाने, बँका, व्यापारी आस्थापना, शासकीय कार्यालये आदी ठिकाणी यंत्रसामग्रीचे विधीवत पूजन करण्यात आले. लक्ष्मीपूजनासाठी लाभलेला मुहूर्त साधण्याकडे प्रत्येकाचा कल होता. महापालिकेच्या तिजोरीची महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते सपत्निक पूजा करण्यात आली. कोषागार कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास उपमहापौर गुरुमित बग्गा, पालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, स्थायी समिती सभापती शिवाजी चुंबळे आदी उपस्थित होते.
घरोघरी केरसुणीची लक्ष्मीच्या स्वरूपात पूजा करण्यात आली. पूजन झाल्यानंतर बाल गोपाळांसह थोरा-मोठय़ांपर्यंत सारेच फटाके उडविण्यात मग्न झाले. प्रमुख बाजारपेठांमध्ये पाच ते दहा हजारांच्या माळांवर अधिक भर असल्याने आवाजाने हा परिसर दुमदुमून गेला होता. निवासी भागात आवाजापेक्षा फॅन्सी प्रकारांना पसंती मिळाल्याचे पाहावयास मिळाले. सिग्नल लाइट, कलर फ्लॅश, ब्रेक व पिकॉक डान्स, व्हिसल व्हील अशा विविध फॅन्सी प्रकारांची आकाशात जणू परस्परांशी स्पर्धा सुरू असल्याचे पाहावयास मिळाले.
दिवाळीच्या कालावधीत आवाजाच्या तीव्रतेचे मोजमाप करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरात ठिकठिकाणी ध्वनी पातळी मोजण्याची मोहीम हाती घेतली आहे. दिवाळीच्या दिवशी सकाळी सहा ते रात्री बारा या कालावधीत फटाके वाजविण्यास परवानगी आहे. फटाक्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या काही विशिष्ट रासायनिक घटकांवर बंदी घालण्यात आली आहे. अशा घटकांचा अंतर्भाव असणाऱ्या फटाक्यांचा वापर किंवा विक्री झाल्यास ही बाब नियमांचे उल्लंघन या सदरात मोडू शकते, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाने आधीच स्पष्ट केले आहे. ध्वनीची पातळी मोजण्याची प्रक्रिया लक्ष्मीपूजनपासून सुरू झाली असून पुढील काही दिवस ती केली जाणार आहे.
ध्वनीची पातळी सर्वसाधारणपणे ५५ ते ६० डेसिबलपर्यंत असते. शहरातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या कारणामुळे या पातळीत चढ-उतार झाल्याचे लक्षात येते. अधिकाधिक ८० डेसिबलपर्यंतचा आवाज सहन केला जाऊ शकतो. त्यापुढील तीव्रतेचा आवाज मात्र सहन करण्यापलीकडे जातो. दिवाळीत फटाक्यांमुळे ही पातळी १५० डेसिबलच्या पुढे जाऊ शकते. फटाक्यांच्या प्रकारानुसार १२५ ते १५० डेसिबलपर्यंतच्या आवाजास शासनाने संमती दिली आहे. शहरातील सीबीएस, पंचवटी, दहीपूल, बिटको चौक आणि सिडको या भागात मंडळाकडून ध्वनीमापन करण्यात आले.