News Flash

माजी नगरसेवकाच्या घरावर गोळीबार ; मालेगाव येथील घटना

खान यांनी घरातील सर्व दिवे बंद केले. हल्लेखोर खान यांना घराबाहेर येण्यासाठी दरडावत होते.

मालेगाव येथे प्रा. रिजवान अमानुल्ला खान यांच्या निवासस्थान परिसराची पाहणी करताना जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. आरती सिंह.

मालेगाव : शहरातील महेशनगर या उच्चभ्रू वस्तीत वास्तव्यास असलेले माजी नगरसेवक प्रा. रिजवान अमानुल्ला खान यांच्या घरावर गुरुवारी पहाटे दोन हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळीबार केला. या घटनेने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

प्रा. रिजवान हे पूर्वी जनता दलातून काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. अलीकडेच काँग्रेसचाही त्याग करत एमआयएम पक्षात ते सक्रिय झाले आहेत. ते पत्नी, मुलांसह घरात झोपले असताना पहाटे दोनच्या सुमारास बेल वाजल्याने त्यांना जाग आली. कोणी बेल वाजवली याची खातरजमा करण्यासाठी आधी त्यांनी खिडकीतून पाहिले. तोंडावर कापड बांधलेले दोन जण त्यांना दिसले. त्यांच्या दिशेने हल्लेखोरांनी गोळीबार केला, परंतु खान हे त्वरित बाजूला झाल्याने बचावले. खान यांनी घरातील सर्व दिवे बंद केले. हल्लेखोर खान यांना घराबाहेर येण्यासाठी दरडावत होते. तसेच त्यांच्या निवासस्थानाच्या चोहोबाजूंनी फेरफटका मारत हल्लेखोरांनी किचन, संडास आणि इतर खोल्यातील खिडक्यांवर सात ते आठ गोळ्या झाडल्या.

खान यांच्या बंगल्याशेजारी वास्तव्यास असलेले पत्रकार जहुर खान आणि नगरसेवक मुश्तकिम डिग्निटी यांना रिजवान खान यांनी भ्रमणध्वनीवरून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर जहुर खान यांनी शहर पोलीस तसेच अग्निशमन दलाला कळविले. भोंगा वाजवत अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळाकडे येत असल्याचा आवाज ऐकताच हल्लेखोरांनी पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपअधीक्षक रत्नाकर नवले, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख हेही आपल्या फौजफाटय़ासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी बंदुकीची सहा रिकामी काडतुसे आढळून आली.

खान यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघे हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. राजकीय वैमनस्यातून ही घटना घडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. आरती सिंह यांनीही दुपारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2020 2:25 am

Web Title: firing at a former corporator house in malegaon zws 70
Next Stories
1 नाशिकला नावीन्यपूर्ण लष्करी उपक्रम केंद्राची वर्षभरानंतरही प्रतीक्षा
2 स्थायी सभापती निवडणूक स्थगित
3 माथाडी कामगारांच्या संपामुळे कोटय़वधींचे व्यवहार ठप्प
Just Now!
X