शाळेचा पहिला दिवस

नाशिक : उन्हाळ्याच्या दीर्घ सुटीनंतर शाळेची घंटा सोमवारी पुन्हा एकदा खणखणली. नियमित विद्यार्थ्यांप्रमाणे पूर्व प्राथमिकच्या वर्गात नवीन विद्यार्थी दाखल झाले. शाळेचा पहिला दिवस असल्याने नव्या गणवेशासह अन्य शैक्षणिक साहित्य तसेच शाळेची नवलाई विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. पालकांचा हात हातात घेत दिमाखात शाळेच्या आवारात दाखल झालेले चिमुकले पालकांचा हात सुटताच कावरेबावरे झाले. काहींनी रडत पुन्हा पालकांकडे धाव घेतली तर काही ऐटीत पुढे निघून गेले. तसेच, शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करत त्यांना खाऊ, अन्य शैक्षणिक साहित्य देत त्यांचे स्वागत करण्यात आले.

शासकीय निर्णयानुसार शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यासाठी महापालिका, जिल्हा परिषदेच्या शाळांसह सर्वच खासगी शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. पूर्व प्राथमिकच्या बाबतीत उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. शाळेत पहिल्यांदाच पाऊल टाकणाऱ्या चिमुकल्यांना शाळा आपलीच वाटावी यासाठी शाळेच्या आवारात रांगोळी, आकर्षक सजावट करण्यात आली होती. पालकांसोबत दिमाखाने वर्गात दाखल होणारे चिमुकले आई-वडिलांचा हात सुटताच रडवेले झाले. काही चिमुकले मात्र नव्याची नवलाई अनुभवत शिक्षकांवरच ‘हे काय आहे’ असे म्हणत प्रश्नांचा भडिमार करत होते. काही लहानग्यांचे पुन्हा पुन्हा पालकांकडे धाव घेणे सुरू  असताना त्यांची रवानगी मग थेट खेळघरात झाली. वेगवेगळ्या खेळण्यात मुले मग्न होताच पालकांनीही काढता पाय घेतला.

प्राथमिक-माध्यमिक विभागातील वातावरण पूर्णत: वेगळे होते. दोन महिन्याच्या सुटीत खेळाचा आनंद लुटल्यानंतर नव्या उत्साहात ही मंडळी शाळेत दाखल झाली. पहिल्याच दिवशी बहुतांश शाळांमध्ये सर्व शिक्षा अभियानअंतर्गत पुस्तके, गणवेश वाटण्यात आली. महापालिका तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमधून शाळाबाह्य़ मुलांनी शाळेत दाखल होण्यासाठी फेरी काढण्यात आली. ग्रामीण भागात सजविलेल्या बैलगाडीतून मुलांना शाळेत आणण्यात आले. पोषण आहाराचाही सत्रातील पहिला दिवस असल्याने मुलांना गोड खाद्य पदार्थ देण्यात आले.

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या नाशिकरोड येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये मुलांमध्ये एकाग्रता यावी यासाठी सामुहिक ओंकार पठण झाले. रुपाली झोडगेकर यांनी संस्कृत श्लोक पठण केले. स्वप्ना मालपाठक यांनी विद्यार्थ्यांना श्लोकाचा अर्थ समजावून सांगितला. यावेळी शासनाच्या आदेशानुसार विद्यार्थी तसेच शिक्षकांना तंबाखु मुक्त शाळेची प्रतिज्ञा देण्यात आली. दरम्यान, विविध उपक्रमांतून शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरावा यासाठी प्रयत्न करण्यात आले.