सिन्नर तालुक्यात करोना रुग्णामुळे चार गावांची सीमा बंद

नाशिक : जिल्ह्य़ाता करोनाचा कहर मोठय़ा प्रमाणावर असतांना जिल्ह्य़ातील पहिला करोनाग्रस्त ३५ वर्षांचा युवक करोनामुक्त झाल्याने आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना यश आले आहे. मंगळवारी संबधित रुग्णाला जिल्हा शासकीय रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. दुसरीकडे, सोमवारी सिन्नर तालुक्यात आढळलेल्या करोना रुग्णामुळे सिन्नर परिसरातील चार गावांची सीमारेषा बंद करण्यात आली असून या गावांचा ताबा आरोग्य तसेच पोलीस विभागाने घेतला आहे. करोनाग्रस्तांच्या संपर्कातील नातेवाईकांसह इतरांचा शोध सुरू असून त्यांच्या अलगीकरणची प्रक्रिया सुरू आहे.

जिल्ह्य़ातील पहिला करोनाग्रस्त युवक करोनामुक्त झाल्याने त्याला मंगळवारी घरी सोडण्यात आले. यावेळी जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी युवकाच्या इच्छाशक्तीला सलाम केला. अवघ्या ११ दिवसात उपचार घेत युवक बरा झाला. तो ‘करोना योध्दा’ म्हणून काम करणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नमूद केले. नाशिक शहरासह जिल्ह्य़ातील चांदवड, मालेगाव, सिन्नर परिसरात करोनाचे रुग्ण आढळले आहेत.

सोमवारी दुपारी सिन्नरच्या पाथरी गावातील ६२ वर्षांच्या व्यक्तीला करोना असल्याचे उघड होताच त्यांना तातडीने नाशिक महापालिकेच्या जाकिर हुसेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या संपर्कात आलेल्या २३ संशयितांना आरोग्य विभागाने अलगीकरण केले आहे. तसेच करोनाग्रस्त रुग्णाचा संबंध आलेल्या वारेगाव, पाथरी बुद्रुक-खुर्द, कोळगामा गावाच्या सीमारेषा बंद केल्या आहेत. चारही गावांचा ताबा आरोग्य तसेच पोलीस विभागाने घेतला आहे. यामध्ये एक हजार ५०५ घरांचे सव्‍‌र्हेक्षण सुरू असून आठ हजार २६४ नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी ३० वैद्यकीय पथके तैनात करण्यात आल्याची माहिती सिन्नर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्य़ात ३६ करोनाबाधित रुग्ण आहेत. मंगळवारी सकाळी १६९ प्रलंबित अहवालांपैकी सहा अहवाल प्राप्त झाले. ते सहाही अहवाल नकारात्मक असून अद्याप १६३ अहवालांची प्रतिक्षा आहे.

मालेगाव पूर्व भाग प्रतिबंधित

मालेगाव येथे सोमवारी करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील एकाला करोनाची लागण झाल्याचे उघड झाले. त्याला उपचारासाठी मालेगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून संपर्कातील अन्य व्यक्तींचे घरीच विलगीकरण करण्यात आले आहे.  मालेगाव पूर्व भागात हे प्रमाण जास्त असल्याने हा भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे.