उत्तर महाराष्ट्रात पहिले स्वयंअर्थ सहायित विद्यापीठ म्हणून संदीप विद्यापीठाला शासनाने मान्यता दिली आहे. या माध्यमातून शैक्षणिक प्रगतीत एक मोलाचा टप्पा गाठला गेला असून नाशिकच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीत त्याचा लाभ होणार असल्याचे संदीप फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप झा यांनी सांगितले.

त्र्यंबकेश्वर रस्त्यावर महिरावणी येथे आठ वर्षांपूर्वी संदीप फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. संस्थेची सध्या दोन अभियांत्रिकी, दोन तंत्रनिकेतन, एक औषधनिर्माणशास्त्र आणि एक व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे शिक्षण दिले जाते. या महाविद्यालयांमध्ये सुमारे आठ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून ती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहेत. ही महाविद्यालये यापुढेही त्याच विद्यापीठाशी संलग्न राहणार असल्याचे झा यांनी नमूद केले. या वर्षी संस्थेमार्फत ८० टक्के विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली. शिक्षण क्षेत्रात बरेच काही करण्यासारखे आहे. विविध अभ्यासक्रम आणि उद्योगांना मनुष्यबळाची असणारी अपेक्षा यात बरीच तफावत आहे.

ही दरी मिटवून विद्यार्थ्यांना रोजगार अथवा स्वयंरोजगारासाठी तयार करणे ही संदीप विद्यापीठाची प्राथमिकता राहील. तसेच संशोधनाला चालना देण्यासाठी विद्यापीठात विशेष सोयी करण्याचा मानस आहे. पहिल्या शैक्षणिक वर्षांत संदीप विद्यापीठात कायदा, व्यवस्थापन, मानवीशास्त्र, वाणिज्य या विषयावरील पदवीचे अभ्यासक्रम सुरू होणार असून आगामी कालावधीत डिझाइन, अच्युरिअल, नॅनो टेक्नॉलॉजी, जैवतंत्रज्ञान, इथिकल हॅकिंग, क्लाऊड कॉम्प्युटिंग तसेच स्थानिक उद्योगांसाठी आवश्यक असणारे वाइन तंत्रज्ञान, साखर तंत्रज्ञान असे अभ्यासक्रम चालविण्यात येणार आहेत.

या विद्यापीठाच्या रूपाने नाशिकमध्ये अनेक संधी उपलब्ध होणार असून त्याचा शैक्षणिक व आर्थिक विकासाला निश्चित लाभ होईल, असे झा यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला फाऊंडेशनचे मार्गदर्शक प्रा. पी. आय. पाटील, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. आर. जी. तातेड, प्राचार्य डॉ. एस. टी. गंधे आदी उपस्थित होते.