महापालिका क्षेत्रातील ११ वी प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी शुक्रवारी दुपारी जाहीर झाली. कला शाखेसाठी चार हजार ७९०, वाणिज्य आठ हजार ५६०, विज्ञान नऊ हजार १९० तसेच एमसीव्हीसीच्या दोन हजार ८६० जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी पहिल्या टप्प्यात २५ हजार ६९० अर्ज प्राप्त झाले होते. यातील २१ हजार २८ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असून प्रथम पसंती क्रमांक १४ हजार ८४५ विद्यार्थ्यांना मिळाला. सहा हजार १६३ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही. कला शाखेसाठी शहर परिसरातील ९० हून अधिक महाविद्यालयांमध्ये दोन हजार ५६३, वाणिज्यसाठी पाच हजार ६२९, विज्ञानसाठी सहा हजार ३९६ आणि एचएसव्हीसीसाठी २५७ याप्रमाणे १४ हजार ८४५ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.

पहिल्या गुणवत्ता यादीत बहुतांश महाविद्यालयांचे गुण (कट ऑफ लिस्ट) ९० टक्क्यांपुढे असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे. शुक्रवारी यादी जाहीर झाल्यानंतर १३ ते १५ जुलै या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ५ आणि १६ जुलै रोजी सायंकाळी ७ पर्यंत पहिल्या गुणवत्ता यादीचे गुण आणि दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी जागा किती, याची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

प्रवेश प्रक्रिया अशी आहे

प्रवेशाच्या वेळी पसंती क्रमांक एक मिळालेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रक्रिया पार पाडताना प्रथम स्टुडंट लॉगिनमध्ये जाऊन प्रोसिड या बटणावर क्लिक केल्यानंतरच त्याचे नाव महाविद्यालयाच्या यादीत समाविष्ट होईल. त्यानंतर महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन आवश्यक कागदपत्रे देऊन प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा. दिलेल्या वेळेत प्रवेश घेणे बंधनकारक असून जे विद्यार्थी पहिल्या पसंती क्रमांकाचे कनिष्ठ महाविद्यालय मिळालेले असतानाही प्रवेश घेणार नाहीत, अशा विद्यार्थ्यांना पुढील फेरीत प्रवेश घेता येणार नाही. त्यांचा १०वी परीक्षेचा आसन क्रमांक आणि ११वी ऑनलाइन प्रवेशाचा अर्ज क्रमांक प्रतिबंधित केला जाईल. पसंती क्रमांक २ ते १० मध्ये नंबर मिळालेल्या विद्यार्थ्यांना जर तो प्रवेश मान्य नसेल, तर अशा विद्यार्थ्यांनी दुसऱ्या गुणवत्ता यादीची वाट पाहावी. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश क्रमांक मिळालेले नाहीत त्यांना पुढील फेरीत गुणवत्ता आणि वैधानिक आरक्षणानुसार उपलब्ध जागेवर प्रवेश मिळतील, आदी सूचना शिक्षण मंडळाकडून करण्यात आल्या आहेत.