वैतरणा परिसरातील आळवंडी धरणात मासेमारी करण्यासाठी गेलेला १८ वर्षीय युवक गुरुवारी बुडाला. सायंकाळी उशिरापर्यंत त्याची माहिती मिळू शकली नव्हती. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

घोटीजवळील आळवंडी धरण परिसरात काही जण मासेमारीसाठी येतात. वावीहर्ष येथून पिंटू शिद (१८) हा सकाळी सात वाजता मासेमारीसाठी आला होता. जाळ्यात किती मासे अडकले हे पाहण्यासाठी टय़ूबच्या साहाय्याने तो जाळीच्या दिशेने गेला. पाण्यातून जाताना त्याने कपडे, भ्रमणध्वनी बाहेर काढून ठेवले होते.

बराच वेळ झाला तरी तो परतला नाही.  त्याचा सर्वत्र शोधघेऊनही तो सापडला नाही. धरण परिसरात मासेमारीसाठी काही लोकांना परवानगी देण्यात आली आहे. त्या ठिकाणी धरण सुरक्षितता तसेच मासेमारी करणाऱ्या व्यवसायिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा गौण ठरतो.