09 April 2020

News Flash

पाच लाखाच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याला मारण्याचा प्रयत्न

वाहनांची जाळपोळ, टवाळखोरांचा धुडगूस, पाच महिन्यात २४ खून आदी कारणांमुळे नाशिक धगधगत आहे.

टिप्पर गँगच्या पाच जणांना अटक

शहराच्या कायदा व सुव्यवस्थेला सुरुंग लावण्यास कारणीभूत ठरलेल्या गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाईस पोलिसांनी सुरूवात केली आहे. सिडको परिसरात एका व्यापाऱ्यास पाच लाखाची खंडणी न दिल्यावरून त्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी अंबड पोलिसांनी टिप्पर गँगच्या म्होरक्यासह पाच जणांना अटक केली. या टोळीतील सदस्यांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. म्होरक्यावर मोक्कांतर्गत कारवाईही झाली होती. विविध भागात फोफावलेल्या टोळ्यांमुळे शहराच्या शांततेला गालबोट लागले असून अशा सर्वच टोळ्यांवर कठोर कारवाईची गरज सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.

वाहनांची जाळपोळ, टवाळखोरांचा धुडगूस, पाच महिन्यात २४ खून आदी कारणांमुळे नाशिक धगधगत आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्यावरून राजकीय पक्षांनी पोलीस यंत्रणेला जबाबदार धरत पोलीस आयुक्तपदी सक्षम अधिकारी नेमण्याची मागणी केली आहे. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आढावा बैठक घेत गुन्हेगारीचा बिमोड करण्याचे निर्देश दिले होते. परिस्थितीत बदल न झाल्यास पोलीस प्रशासनात बदल करण्याचे संकेत त्यांनी दिले. या इशाऱ्यामुळे गेल्या काही दिवसात पोलीस यंत्रणा कमालीची सक्रिय झाली आहे. मागील आठवडय़ात पंचवटीत मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या आणि नंतर जामिनावर सुटलेल्या संशयितांनी एकाचा खून तर एकावर प्राणघातक हल्ला चढविला होता. तत्पुर्वी, नाशिकरोड भागात तर तडिपार गुंडाला अपक्ष नगरसेवक पवन पवारने आपल्या संपर्क कार्यालयात आश्रय दिल्याचे उघड झाले. जामिनावर सुटलेल्या आणि तडिपार गुंडांकडून दहशत पसरवण्याचे प्रकार होत असल्याचे लक्षात घेऊन पोलिसांनी टोळ्यांवर कारवाईकडे लक्ष केंद्रीत केले आहे. सिडको परिसरात टिप्पर गँगची दहशत आहे. या टोळीने पिस्तुलाचा धाक दाखवत स्थानिक व्यापाऱ्याला पाच लाखाची खंडणी मागितली. या संदर्भातील माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त अतुल झेंडे, अंबड पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश बर्डिकर आदींनी तात्काळ संशयितांना पकडण्यासाठी छापेसत्र सुरू केले. या कारवाईत शाकीर नासीर पठाण, गणेश सुरेश वाघ उर्फ गण्या कावळ्या, मुकेश राजपूत, किरण पेलमहाले, देवदत्त घाटोळे व एक अल्पवयीन बालकास जेरबंद करण्यात आले. या टोळीचा म्होरक्या गण्या कावळ्यावर विविध पोलीस ठाण्यात १५ ते २० गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी मोक्कांतर्गत त्याच्यावर कारवाई केली होती. काही दिवसांपूर्वी तो जामिनावर सुटला. पोलीस त्याचा माग काढत होते. पण, तो मिळून येत नव्हता. अखेरीस ही मोहीम मंगळवारी रात्री यशस्वी झाली आणि टिप्पर गँगला जेरबंद करण्यात आले. या आधी या टोळक्याने खंडणीसाठी अनेकांना धमकावले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2016 12:24 am

Web Title: five arrested of tipper gang in nashik in extortion case
टॅग Nashik
Next Stories
1 निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्यावर टंचाईचे सावट
2 ‘शिक्षण हक्क’ प्रवेशातही अतिरिक्त शुल्काचा बोजा?
3 सरकारी कामांची माहिती अद्याप संकेतस्थळावर नाही
Just Now!
X