जिल्ह्य़ास गड-किल्ल्यांचा मोठा इतिहास आहे. जिल्ह्य़ात छोटे-मोठे एकूण ७० किल्ले असून त्यांच्या संवर्धनासाठी प्रारंभी पहिल्या टप्प्यात पाच किल्ल्यांची निवड करून पर्यटनवाढीसाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी केले.
येथील दुर्ग संवर्धनतर्फे आयोजित ‘चला किल्ले बघू या..’ या छायाचित्र प्रदर्शनास गड-किल्लेप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनाच्या समारोप सोहळ्यात आ. फरांदे यांनी किल्लेसंवर्धनासंदर्भात वनमंत्र्यांची भेट घेऊन लवकरच प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन दिले. नाशिकमधील गडकोट संवर्धनाचे काम करणाऱ्या संस्थांसोबत लवकरच बैठक आयोजित केली जाईल. किल्ल्यांवर जाण्यासाठी पायथ्याशी किल्ल्याची माहिती दर्शविणारे फलक, निवास व्यवस्था, पाण्याची गरज, दगडी पायऱ्यांचे बांधकाम, किल्ल्यावर दिशादर्शक फलक, नकाशे आदी प्राथमिक गरजा पूर्ण करण्याचा विचार आहे.
त्यासाठी स्थानिक वास्तुविशारदांची मदत घेतली जाईल. वास्तुविशारद सुनील पुराणिक यांनी किल्ल्यांसाठी काम करण्याची तयारी दर्शविली आहे. दुर्ग संवर्धन प्रतिष्ठान याबाबत पाच किल्ल्यांची माहिती तयार करून अहवाल सादर करणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास जिल्ह्य़ातील किल्ल्यांना गतवैभव प्राप्त होणार आहे. संस्थेच्यावतीने शहरात लवकरच किल्ले दर्शन गाडी सुरू केली जाणार आहे. या प्रदर्शनास मोठा प्रतिसाद मिळाला असून तीन दिवसांत पाच हजार गडकोटप्रेमींनी भेट देऊन माहिती जाणून घेतली. या वेळी राजवाडे संशोधन मंडळाचे सचिव व ज्येष्ठ गडकोट अभ्यासक डॉ. जी. बी. शाब, औरंगाबाद येथील प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे अध्यक्ष शिवाजी गाडे पाटील, आंतरराष्ट्रीय धावपटू अंजना ठमके आदी उपस्थित होते.