सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील मिरगाव फाटय़ाजवळ गुरुवारी सकाळी इनोव्हा आणि मालमोटार यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चार साईभक्त ठार झाले, तर चालक जखमी झाला. मृतांमध्ये तीन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. हे सर्व जण ठाणे, मुंबई व गुजरातमधील रहिवासी होते. अपघातास कारणीभूत ठरलेल्या मालमोटार चालकाविरुद्ध वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. देवळा-सटाणा रस्त्यावर झालेल्या दुसऱ्या अपघातात एक जण ठार झाला.
मुंबई व गुजरात येथील साईभक्त शिर्डी येथे दर्शनासाठी इनोव्हा कारने निघाले होते. बुधवारी रात्री एक वाजेच्या सुमारास वावी येथील मीरगाव फाटा परिसरात इनोव्हा आली असताना हा अपघात झाला. अंधारात समोरून येणाऱ्या मालमोटारीचा अंदाज आला नाही आणि इनोव्हा आणि मालमोटार यांची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, इनोव्हाच्या बहुतांश भागाचा चक्काचूर झाला. आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी धाव घेऊन सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात हलविले. अपघातात रेखाबेन किशोरभाई लखवाणी (४०, मीरारोड, ठाणे), डायाभाई लक्ष्मणभाई बदाणी (६१ भावनगर, गुजरात) यांचा जागीच मृत्यू झाला. पुरीबेन डायाभाई बदाणी (५५, गुजरात) आणि मुक्ता दिनेश लखवाणी (३८, विलेपार्ले) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने शिर्डीच्या रुग्णालयात हलविण्यात आले; परंतु उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान इनोव्हा मोटारीची ‘एअर बॅग’ उघडल्यामुळे चालक बचावला. त्याच्यावर शिर्डी येथे उपचार सुरू आहेत.
अपघातग्रस्त वाहनांमुळे सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा येण्याची शक्यता होती. यामुळे पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने ही वाहने बाजूला केली. स्थानिक ग्रामस्थ सागर राजेभोसले, राहुल पठाडे यांनी पोलिसांना सहकार्य केले. गुरुवारी सकाळी वावी पोलिसांनी मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क साधत अपघाताची माहिती दिली. विच्छेदनानंतर दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच, पोलिसांनी मालमोटारसह चालकास ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठेंगोडा शिवारात एक ठार
सटाणा-देवळा रस्त्यावर गुरुवारी सकाळी एसटी बसने दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. दौलत नानाजी आहेर (५०) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मूळचे देवळ्याचे असणारे आहेर सध्या कळवण येथे वास्तव्यास होते. सकाळी दुचाकीवरून ते निघाले असताना हा अपघात झाला. नंदूरबारहून महाडला निघालेल्या बसने ठेंगोडा शिवारात त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात आहेर यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.