पूरग्रस्तांना मदतीचा ओघ कायम

सांगली, कोल्हापूर भागातील पूरग्रस्त आणि बचाव, मदत कार्य राबविणारे सैन्यदल, एनडीआरएफ, पोलीस आणि प्रशासन, स्वयंसेवी संस्थांसाठी स्थानिक पातळीवरून मदतीचा ओघ कायम आहे. मंगळवारी येथील कडकनाथ अ‍ॅग्रो वर्ल्ड संस्थेच्या माध्यमातून ३० हजार कडकनाथ अंडी मदतकार्य करणाऱ्या अधिकारी-जवानांसाठी कोल्हापूरकडे रवाना करण्यात आली. प्रतिकूल परिस्थितीत एक परिपूर्ण आहार मिळावा, रोगप्रतिकारक शक्ती प्रभावी राहावी या उद्देशाने साडेसात लाख रुपयांची अंडी पाठविण्यात आली.

सांगली, सोलापूर, कोल्हापूर भागात महापुराने जीवित आणि वित्तहानी झाली आहे. घरे पाण्याखाली गेल्याने हजारो नागरिकांना मदत शिबिरामध्ये आश्रयाला जावे लागले. पश्चिम महाराष्ट्राला नैसर्गिक आपत्तीतून बाहेर काढण्यासाठी सैन्यदल, एनडीआरएफ, पोलीस, प्रशासन, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. पूरग्रस्तांना मदतीसाठी स्थानिक पातळीवर अनेक सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, संस्था, संघटना पुढे सरसावल्या आहेत.

पश्चिम महाराष्ट्रावर कोसळलेले संकट लक्षात घेऊन कडकनाथ कोंबडींचा व्यवसाय करणारे व्यावसायिक पुढे आले आहेत. या कोंबडीचे अंडे सर्वसाधारण अंडय़ापेक्षा वेगळे असते. त्यातून अधिक ऊर्जा प्राप्त होत असल्याचे सांगितले जाते. पूरग्रस्त भागात रोगराईचे संकट घोंघावत आहे. या स्थितीत स्थानिकांची रोगप्रतिकारक क्षमता कायम ठेवण्यास कडकनाथ अंडे महत्त्वाची भूमिका बजावेल, असे संस्थेचे संदीप सोनवणे यांनी म्हटले आहे. सामाजिक दायित्वातून संस्थेने देशात, परदेशात निर्यात होणारी प्रोटिनयुक्त अंडी सैन्यदल, पोलीस दलातील जवानांना देण्याचे ठरवले. त्यानुसार मुख्यमंत्री कार्यालय, कोल्हापूरमधील अधिकाऱ्यांशी चर्चा करून वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. कडकनाथच्या मुख्य वितरण केंद्रातून साडेसात लाख रुपयांची ३० हजार अंडी घेऊन प्रशांत गुजराथी, प्रीतम भट, अभिजित इंगोले, संदीप पंचभाई, सुदाम राठोड आदींचे पथक रवाना झाले. कोल्हापूर येथील मदत शिबिरांमध्ये प्रत्यक्ष जाऊन या अंडय़ांचे वितरण केले जाणार आहे.

शिवसेना नगरसेवकांकडून महिन्याचे मानधन

नैसर्गिक आपत्तीने कोसळलेले संकट लक्षात घेऊन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नाशिक महापालिकेतील शिवसेनेचे सर्व नगरसेवक आपले एक महिन्याचे मानधन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविणार आहेत. याबाबतची माहिती विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे यांनी दिली. या मदतीसोबत पूरग्रस्तांसाठी गहू, तांदूळ, कडधान्य, कपडे, औषधे, जीवनावश्यक वस्तूदेखील पाठवल्या जाणार आहेत.