13 December 2019

News Flash

पुरामुळे नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यातून पक्ष्यांचे स्थलांतर

मागील आठवडय़ात गोदावरीला आलेल्या महापुराचा माणसांसह पशु-पक्ष्यांनाही फटका बसला आहे

संग्रहित छायाचित्र

मागील आठवडय़ात गोदावरीला आलेल्या महापुराचा माणसांसह पशु-पक्ष्यांनाही फटका बसला आहे. नांदुरमध्यमेश्वर धरण परिसरातील पक्षी अभयारण्यातील घरटी, अंडी वाहून गेली असून विणीचा मोसम गेला आहे.

पुराआधी परिसरात १५० फ्लेमिंगो होते. पुरानंतर त्यांनी नांदुरमध्यमेश्वर सोडले आहे. पूर परिस्थितीमुळे पक्ष्यांच्या जीवनमानावर विपरीत परिणाम जाणवेल, अशी भीती पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे. पुरामुळे गोदाकाठावरील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असताना महाराष्ट्राचे भरतपूर असलेल्या ‘नांदुरमध्यमेश्वर’ या पक्षी अभयारण्याला याचा सर्वाधिक फटका बसला. या परिसरात नांदुरमध्यमेश्वर धरण असून या धरणातून पावसाच्या पहिल्याच दमदार हजेरीत ८५ हजार दशलक्ष घनफुट (८५ टीएमसी) विसर्ग धरणातून झाला. या विसर्गाने अभयारण्य परिसर जलमय झाला. अभयारण्यात देश-विदेशातील पक्षी मुक्कामासाठी येत असतात. काही दिवसांपूर्वी पक्ष्यांनी मुक्काम हलविला असला तरी स्थानिक वेगवेगळ्या प्रकारच्या पाणकोंबडय़ा प्रकारातील पक्षी, हळदी-कुंकू बदक, कमळपक्षी, जांभळी पाणकोंबडी, नांदुरची राणी, गवताळ पक्षी धरण परिसरात मुक्कामी होते.  ऑगस्ट महिन्यातील पहिले दोन आठवडे हा या स्थानिक पक्ष्यांचा विणीचा मोसम (अंडी घालण्याचा, घरटी बांधण्याचा) काळ आहे. त्या दृष्टीने पक्ष्यांनी झाडावर तर काही ठिकाणी गवताळ भागात, मनोऱ्यालगत ठिकठिकाणी घरटी बांधत अंडी घालण्यास सुरुवात केली. परंतु, मागील आठवडय़ातील जोरदार पावसामुळे घरटी थेट पुराच्या पाण्यात वाहून गेली. अंडीही वाऱ्यामुळे फुटली. यातील जीवितहानी मोजता येण्यासारखी नाही. स्थानिक पक्ष्यांसह स्थलांतरित पक्षी मुक्काम म्हणून पाणथळ, गवताळ भागात थांबतात. आवश्यकतेनुसार पुढे प्रवासासाठी झेप घेतात. पावसाचा तसेच पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने येथील पक्ष्यांना पुराचा फटका बसला. अद्याप अभयारण्य परिसरात पाणी, गाळ, चिखल असल्याने चित्र स्पष्ट झाले नसले तरी पक्ष्यांचा विणीचा हंगाम पूर्णत गेल्याने पुढील काळात याचे विपरीत परिणाम दिसतील, अशी भीती पक्षीमित्र आनंद बोरा यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य परिसराचे वनपाल अशोक काळे यांनी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अभयारण्यातील पक्षी जायकवाडी, दारणासह अन्य मोठय़ा धरण परिसराकडे स्थलांतरित होत असल्याचे सांगितले. स्थानिक तसेच काही स्थलांतर करताना मुक्कामी थांबणारे पक्षी या ठिकाणी असतात. मागील आठवडय़ात १५० फ्लेमिंगो या परिसरात होते. पुराचा फटका पक्ष्यांना बसला आहे. पुराच्या दूषित पाण्यामुळे, पाण्याच्या वाढलेल्या पातळीमुळे पक्ष्यांना परिसरात थांबता येत नाही. पाणी कमी झाल्यावर  शेवाळ येईल. अद्याप पक्ष्यांना खाद्य मिळत नसल्याने त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम जाणवत आहे. मालमत्ता, मनुष्यांच्या जीवितहानीचे नुकसान मोजता येते, पक्ष्यांचे कसे मोजणार, असा प्रश्न काळे यांनी उपस्थित केला.

अनेक पक्षी जखमी

पुरामुळे अनेक पक्षी जायबंदी झाले. काहींची घरटी वाहून गेली. अंडी उबवण्याचा काळ वाया गेल्यामुळे एक पिढी नामशेष होत आहे. हे नुकसान भरून येण्यासारखे नाही. पुरामुळे स्थलांतरित पक्ष्यांना अभयारण्यात थांबता येत नाही. स्थानिक पक्ष्यांनाही या ठिकाणी खाद्य मिळत नसल्याने त्यांना अन्य ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागले. पुराचे पाणी संपूर्णत ओसरल्यानंतर चित्र अधिक स्पष्ट होईल. पुढील काळात याचे दूरगामी परिणाम जाणवतील, अशी भीती आहे.

-प्रा. आनंद बोरा  (पक्षीमित्र)

First Published on August 14, 2019 2:06 am

Web Title: flood is an overflow forest bird injury mpg 94
Just Now!
X