News Flash

दमदार पावसात पूरस्थितीचे संकट

पूर्ण भरण्याच्या स्थितीत असणाऱ्या धरणात आताच १०० टक्के जलसंचय केला जाणार नाही.

संग्रहित छायाचित्र

सहा धरणे तुडुंब तर नऊ भरण्याच्या मार्गावर

गतवर्षांचा अपवाद वगळता मागील काही वर्षे दुष्काळाच्या छायेखाली वावरणाऱ्या नाशिक जिल्ह्यात यंदा अल्पावधीतील पावसाने सहा धरणे तुडुंब भरली असून नऊ धरणे पूर्ण भरण्याच्या स्थितीत आहेत. पावसाचा दोन महिन्यांचा कालावधी आहे. यामुळे पूर्ण भरण्याच्या स्थितीत असणाऱ्या धरणात आताच १०० टक्के जलसंचय केला जाणार नाही. यामुळे पुढील काळात जेव्हा पाऊस होईल, तेव्हा धरणांमधून पाणी सोडले जाईल आणि साहजिकच गोदावरी, दारणा व कादवासह अन्य लहान-मोठय़ा नद्यांना पूरस्थितीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

सुरुवातीच्या काळात हजेरी लावून महिनाभर अंतर्धान पावलेल्या पावसाने जुलै महिन्यात संपूर्ण कसर भरून काढली. निम्म्या तालुक्यात सलग काही दिवस संततधार सुरू राहिल्याने जलसाठा उंचावण्यास मदत झाली. जुलैच्या अखेरच्या सप्ताहात सहा धरणे ओसंडून वाहत आहे. त्यात आळंदी, वाघाड, भावली, वालदेवी, भोजापूर व हरणबारी यांचा समावेश आहे. मध्यम व मोठय़ा प्रकल्पात किती व कसे पाणी साठवले जावे याचे वेळापत्रक असते. त्यानुसार चार महिन्यात अखेरच्या टप्प्यात धरण पूर्ण क्षमतेने भरले जाते.

जुलै महिन्यात मध्यम व मोठे धरण साधारणत: ७५ टक्के भरले जाते. २५ टक्के रिक्त ठेवण्यामागे अचानक अतिवृष्टी झाल्यास धरणात जलसंचय करण्यासाठी काही जागा राखणे आवश्यक ठरते. परिणामी, पाऊस असूनही नऊ धरणांमध्ये सरासरी ८० टक्क्यांपर्यंत जलसाठा कायम ठेवून उर्वरित पाणी सोडले जात आहे.

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूरमध्ये ४४८२ दशलक्ष घनफूट (८० टक्के) जलसाठा झाला आहे. या धरणातून पुन्हा ३९९७ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. या शिवाय दारणा धरणातून ६६१०, कडवामधून ४१७६, पालखेड ३४००, आळंदी २७१६, वालदेवी ५९८ विसर्ग सुरू असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली. नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडीसाठी ४९ हजार ४७८ क्युसेक्स पाणी जात आहे.

जिल्ह्यतील नऊ धरणांमध्ये ८० ते ९२ टक्के जलसाठा झाला आहे. त्यात गंगापूरसह काश्यपी १६९९ (९२ टक्के), गौतमी गोदावरी १७१४ (९२), करंजवण ४३९२ (८२), वाघाड ७१३९ (८६), दारणा ६२७६ (८८), कडवा १४४२ (८५), नांदूरमध्यमेश्वर २४३ (९५), केळझर ४८६ (८५) असा जलसाठा आहे. उर्वरित पालखेड ४४५ (६८), ओझरखेड १२५६ (५९), पुणेगाव ४१६ (६७), तिसगाव १६१ (३६), चणकापूर १५३४ (६३), गिरणा १०७६१ (४८) जलसाठा असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली.

जिल्ह्यातील धरणांमध्ये ६७ टक्के जलसाठा

जुलैच्या अखेरीस यंदा जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठा ४४ हजार १८३ अर्थात ६७ टक्क्यांवर पोहोचला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण २६ टक्क्यांनी अधिक आहे. जिल्ह्यातील २४ लहान-मोठय़ा धरणांची एकूण क्षमता ६५ हजार ८१४ दशलक्ष घनफूट इतकी आहे. सध्या ४४ हजार १८३ दशलक्ष घनफूट जलसाठा झाला आहे. गतवर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला होता. परंतु, तेव्हादेखील जुलैअखेर धरणांमध्ये केवळ २७ हजार २७६ दशलक्ष घनफूट जलसाठा झाला होता.

नागासाक्या, माणिकपुंज कोरडेठाक

जिल्ह्यातील जवळपास २२ धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा झाला असताना नागासाक्या व माणिकपुंज ही धरणे भर पावसाळ्यात कोरडीठाक आहेत. या धरणांमध्ये अद्याप एक दशलक्ष घनफूटही जलसाठा झाला नसल्याचे पाटबंधारे विभागाची आकडेवारी सांगते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 2:03 am

Web Title: flood situation in nashik heavy rain in nashik
Next Stories
1 ‘इंदू सरकार’ विरोधात काँग्रेसचे आंदोलन
2 .. अखेर आधार कार्ड नोंदणी सुरू
3 महिलांसाठीचे ‘हकदर्शक अ‍ॅप’चा रडतखडत प्रवास
Just Now!
X