चिखलमय झालेले घरे, दुकाने व परिसराची स्वच्छता.. भिजून खराब झालेले साहित्य बाहेर काढण्याची धडपड.. संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्यामुळे कित्येकांच्या डोळ्यात दाटलेले अश्रू.. काहींनी धसक्याने कायमचे अन्यत्र स्थलांतरित होण्यासाठी चालविलेली आवरासावर..

गोदावरीच्या महापुराचा तडाखा सहन करणाऱ्या गोदाकाठावरील निवासी आणि बाजारपेठ परिसरात बुधवारी हे चित्र पाहावयास मिळाले. सलग पंधरा तास सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मंगळवारी रात्रीपासून काहीशी उघडीप घेतली आणि शहरवासीयच नव्हे तर, महापालिका व पोलीस प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास टाकला. कारण, मंगळवारी पहाटे पाच ते बारापर्यंतचा कालावधी सर्वाची परीक्षा पाहणारा ठरला. पाऊस व पुराचे पाणी घरात शिरण्याची शक्यता गृहीत धरून सुरक्षित स्थळी गेलेली बहुतांश कुटुंबे बुधवारी सकाळपासून माघारी परतण्यास सुरुवात झाली. गंगापूर रस्त्यावरील आसाराम बापू आश्रमासमोरील परिसर, भगूरकर चाळ, अयाचितनगर, होरायझन अकॅडमीसमोरील परिसर, गोदा पार्कलगतच्या सुयोजितमधील इमारती व रो हाऊस आदी परिसर कमी-अधिक प्रमाणात गोदावरीच्या पाण्यात बुडाला होता. भांडी बाजार व सराफ बाजारासह मध्यवस्तीतील अनेक दुकानांमध्येही पाणी शिरले होते. नासर्डी नदीकाठासह सखल भागातील घर, दुकाने व झोपडपट्टय़ांची वेगळी स्थिती नव्हती. मंगळवारी सकाळी पुराचे पाणी वाढू लागल्यानंतर बहुतेकांनी सुरक्षितस्थळी जाणे पसंत केले होते.

बुधवारी महापुरामुळे घराची झालेली बिकट अवस्था पाहून ते अवाक्  झाले. कोणत्या भागात कुठपर्यंत पाणी होते याच्या खुणा भिंतींवर स्पष्टपणे पाहावयास मिळत होत्या.

अयाचितनगरमधील तारांगण रोहाऊसमधील १५ घरे साधारणत: १२ फूट पाण्याखाली बुडाली होती. त्यामुळे तळमजल्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले होते. घरातील बहुतांश साहित्याची दुर्दशा झाली. फर्निचर, फ्रिज, किचनमधील सामग्री, इलेक्ट्रॉनिक्स साहित्य व तत्सम वस्तू बाहेर काढण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. अनेक कुटुंब मित्र व नातेवाईकांना सोबत घेऊन स्वच्छता मोहिमेला भिडले. काहींनी खासगी टँकर मागवत पाण्याच्या फवाऱ्यांनी चिखल काढण्यास सुरुवात केली. इमारत व बंगल्यांच्या पाण्याच्या टाकीतही पाणी गेल्यामुळे महापूर येऊनही अनेकांना शुद्ध पाणी विकत घ्यावे लागले. सुयोजित गार्डनमधील रोहाऊसमध्ये तीन फुटांपर्यंत पाणी शिरले. २००८ मधील महापुरावेळी ही स्थिती अनुभवणाऱ्या रहिवाशांच्या गाठीशी अनुभव होता. त्यामुळे त्यांनी खबरदारी बाळगत तयारी केली होती. तथापि, अनेक जण प्रथमच या स्थितीला सामोरे गेले. सुयोजित गार्डनमधील एच. कपासी त्यापैकीच एक. त्यांच्या घरातील तळमजल्यावरील साहित्याचे बरेच नुकसान झाले.

या परिसरातील तारांगण इमारतीत पाच ते सहा फूट पाणी शिरले होते. तळमजल्यावरील सदनिकांमध्ये पाणी शिरून बरेच नुकसान झाले. महापुराच्या धसक्याने काहींनी या भागातून अन्यत्र कायमस्वरूपी स्थलांतरित होण्याचाही निर्णय घेतला.

भांडी बाजार, सराफ बाजार, पंचवटीतील नदीकाठालगतचा परिसरातील बाजारपेठेत ही स्थिती होती. सराफी व्यावसायिकांनी दक्षता घेऊन मौल्यवान साहित्य आधीच हलविले होते. त्यामुळे त्यांचे नुकसान झाले नाही; परंतु भांडी बाजारातील दुकाने, हॉटेल्स, मिठाई, पूजा साहित्याचे विक्रेते अशा सर्वाचे साहित्य पुराने धुवून नेले. आपल्या दुकानाची अवस्था पाहून व्यापारी हताश झाले. ज्या ज्या भागात पुराचे पाणी पोहोचले, तो परिसर चिखलमय झाला होता. अग्निशमन विभागाने बंबांद्वारे हा परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात केली. नदी काठालगत आणि सखल भागात वास्तव्यास असणाऱ्या गोरगरिबांचे संसार पावसाने रस्त्यावर आणले. संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्याने वा पूर्ण खराब झाल्यामुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.