साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याच्या स्वागतासाठी बाजारपेठ सजली आहे. बाजारपेठेवर पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सावट असले तरी खरेदीचा उत्साह कायम राहिला. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेसह अन्य ठिकाणी झेंडुची फुले मोठय़ा प्रमाणावर विक्रीस आली. फुलांच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे.

दसऱ्यानंतर काही दिवसातच दिवाळीचे आगमन होणार असल्याने या दोन्ही सणांची एकदाच खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे. दसऱ्याला होणारी फुलांची आरास पाहता बाजारपेठेत झेंडुची फुले मोठय़ा प्रमाणावर दाखल झाली. सततच्या पावसाने फुलांचे काही प्रमाणात नुकसान झाल्याने आवक कमी राहिल्याने फुलांचे दर दसऱ्याच्या पूर्वसंध्येला अधिक होते. झेंडुसह शेवंती, जरबेरा, ऑर्किड आदी फुलांचा दर सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाकाबाहेर राहिला. झेंडुचे दर १०० रुपये शेकडा, तर जाळीसाठी २०० रूपये, शेवंती २०० रुपये किलो होते. दसऱ्याला सोने खरेदीला विशेष प्राधान्य असल्याने शहरातील सराफ बाजारपेठेत ग्राहकांनी गर्दी केली. दसऱ्यासाठी काहींनी दागिन्यांची आगावू नोंदणी केली. काहींनी सोन्या-चांदीची मजुरी, घटनावळ, व्यवसायिकांकडून काय सवलत दिली जात आहे याची विचारणा केली. अनेकांनी वेगवेगळ्या सुवर्ण संचय किंवा अन्य योजनेत पैसे गुंतवित सोने खरेदीचा मुहूर्त साधण्याचा प्रयत्न केला. वाहन बाजारातही चांगली मागणी राहिली.

दसऱ्याला परंपरेनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आडगाव, म्हसरूळ, पंचवटी, भोसला, सिडको, इंदिरानगर, नाशिकरोड आदी ठिकाणी शस्त्रपूजन करण्यात आले. शस्त्रपूजनानंतर स्वयंसेवकांनी सामूहिक समता, दंड प्रात्यक्षिक, सूर्यनमस्कार, निर्युध्द अशा प्रकारची शारीरिक प्रात्यक्षिके केली.