19 October 2019

News Flash

सात तालुक्यांतील चारा संपुष्टात

जिल्ह्य़ातील नऊ तालुके दुष्काळाने होरपळत असून शेकडो गावे-वाडय़ांना टँकरने पाणी दिले जात आहे

संग्रहित छायाचित्र

पाणी टंचाईबरोबर नवे संकट

अनिकेत साठे, नाशिक

पाण्याअभावी ग्रामीण भागात बिकट स्थितीला तोंड द्यावे लागत असताना आता त्यात चारा टंचाईचीही भर पडली आहे. सात तालुक्यांतील चारा एकतर संपुष्टात आला, तसेच संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. आवक घटल्याने त्याचे दरही उंचावले आहेत. जिल्ह्य़ात एकूण १२ लाख ३७ हजार ३१३ जनावरे असून दुष्काळात हे पशुधन वाचविण्यासाठी जिथे अतिरिक्त चारा आहे, तो टंचाई क्षेत्रात नेण्याचा एकमेव पर्याय आहे.

जिल्ह्य़ातील नऊ तालुके दुष्काळाने होरपळत असून शेकडो गावे-वाडय़ांना टँकरने पाणी दिले जात आहे. अनेक भागांत महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असून काही ठिकाणी हंडाभर पाण्यासाठी त्यांना खोल विहिरीत उतरावे लागत आहे. टंचाईला तोंड देणाऱ्या गावांची तहान भागविण्यासाठी यंत्रणेने १०३ पेक्षा अधिक विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.

दुसरीकडे जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न तितकाच बिकट बनला आहे. जिल्ह्य़ात १० लाख १५ हजार ७३२ मोठी, तर दोन लाख २१ हजार ५८१ लहान जनावरे आहेत. त्यांना प्रत्येक महिन्याला दोन लाख दोन हजार ७७६ मेट्रिक टन चाऱ्याची गरज असते. टंचाईची स्थिती उद्भवणार हे लक्षात घेऊन प्रशासनाने आधीच जिल्ह्य़ाबाहेर चारा नेण्यास बंदी घातली होती.

तसेच गाळपेरा क्षेत्रावर चारा लागवडीचा प्रयोग करण्यात आला. धरण, तलावातील जलसाठा कमी झाल्यानंतर बुडिताखालील जमिनी उघडय़ा पडतात. या जमिनींचा वापर दरवर्षी गाळपेर पिकांसाठी केला जातो. चारा टंचाईवर मात करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वीच १२०० हेक्टर गाळपेरा क्षेत्रात मका, ज्वारी, बाजरी किंवा वैरण पिके घेण्यासाठी मोफत बियाणे वाटप करण्यात आले होते. या उपक्रमाने चारा टंचाईवर मात करण्यास काहीअंशी हातभार लागला, परंतु हा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही.

दुष्काळाच्या तडाख्यात सापडलेल्या नांदगाव, मालेगाव, देवळा, चांदवड, सिन्नर, येवला, दिंडोरी या तालुक्यांतील जनावरांना एप्रिल महिन्यापर्यंत चारा पुरणार होता. नाशिक आणि निफाड तालुक्यात शिल्लक चारा अनुक्रमे मे, जूनपर्यंत पुरेल. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा तालुक्यांमध्ये शिल्लक चारा सप्टेंबपर्यंत जनावरांची गरज भागविणार आहे. हा चारा ज्या भागात तो पूर्णत: संपुष्टात आला, तिकडे नेण्याचा पर्याय पशुसंवर्धन विभागाने सुचविला आहे. त्यावर अंतिम निर्णय जिल्हा प्रशासनाला घ्यावा लागणार आहे.

टंचाईग्रस्त भागांत अधिक पशुधन

नांदगाव, मालेगाव, देवळा, चांदवड, सिन्नर, येवला, दिंडोरी तालुक्यात चारा टंचाईचे संकट ओढावले आहे. जिल्ह्य़ात सर्वाधिक एक लाख ३७ हजार ४८ जनावरे मालेगावमध्ये, तर सर्वात कमी ४१ हजार ७२५ पेठ तालुक्यात आहेत. नाशिक तालुक्यात ७५७५५, इगतपुरी ६२२०१, त्र्यंबकेश्वर ६१३४६, निफाड ९८१९०, चांदवड ८०९४३, येवला ९८५६२, सिन्नर १०६५६४, कळवण ६७३१२, दिंडोरी ९८८९३, देवळा ४६११४, सुरगाणा ५८४२८, सटाणा ११५७००, नांदगाव ८३५३२ अशी लहान-मोठी जनावरे आहेत. चारा संपुष्टात आलेल्या सर्व तालुक्यांमध्ये पशुधन मोठय़ा प्रमाणात आहे. चारा शिल्लक असणाऱ्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा तालुक्यांत पशुधनाची संख्या तुलनेत कमी आहे.

एरवी १८०० ते दोन हजार रुपये प्रति टन दराने मिळणारी उसाची बांडी आज तीन हजार ३२०० रुपयांना खरेदी करावी लागत आहे. वैरण, खुराक आदींचे दर उंचावले असून संगोपन खर्च वाढल्याने त्याचा परिणाम दुधाचे दर उंचावण्यात झाला. उन्हाळ्यात दुधाची मागणी वाढते. सध्या म्हशीचे दूध ६० ते ७० रुपये, तर गायीचे दूध ४० रुपये लिटर आहे.

– नितीन आव्हाड  (पशुपालक, मखमलाबाद)

First Published on May 8, 2019 4:12 am

Web Title: fodder over in seven talukas