‘उन्हाळी सुट्टीतील धमाल आणि खवय्यांच्या राज्यात चौफेर मुशाफिरी’ हे समीकरण विश्वास सहकारी बँक आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या वतीने आयोजित ‘नाशिक चौपाटी’ या अनोख्या उपक्रमामुळे जुळून आले. प्रारंभीच्या दोन दिवसांत या उपक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
चौपाटी म्हटले की, डोळ्यासमोर येतो चित्रपटात दाखविलेला चौफेर समुद्र, किनाऱ्यावरील चाट, खेळण्यांची दुकाने. नेहमीच्या या संकल्पनेस छेद देत गंगापूर रस्त्यावरील विश्वास लॉन्स परिसरात ‘नाशिक चौपाटी’ बहरली. नाशिकची खासीयत सांगणाऱ्या विविध खाद्य पदार्थाचा नजराणा ‘नाशिक चौपाटी’च्या माध्यमातून एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आला आहे. विश्वास बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी ही संकल्पना मांडली. या महोत्सवात पाणी-पुरी, शेव-पुरी सोबत तोंडाला पाणी आणणारे विविध चाट, मस्का मारत तापलेल्या तव्यावरची लज्जतदार पावभाजी, त्यावर सहज विरघळणारे चीज, गरमागरम कढईतून बाहेर पडणारा पाववडा- साबुदाणावडा यासह अन्य खाद्यपदार्थ, सुगरणीच्या हाताने सजलेली पुरणपोळी यासह अन्य खाद्यपदार्थ आदींचा समावेश आहे. चौपाटी उत्सवात ३६ स्टॉलधारक सहभागी झाले आहेत. या महोत्सवाचे वैशिष्टय़ म्हणजे उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन आबालवृद्धांना आवडणारे विविध प्रकारचे आईस्क्रीम. खोबरे, कॉर्नफ्लेक्स, व्हिटफ्लेक्स, ब्रेड क्रम्स या पदार्थाचे आवरणात तळलेले ‘फ्राइड आइस्क्रीम’ खवय्यांचे लक्ष वेधत आहे. तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली जाणार आहे. काही स्टॉलधारकांनी विक्रीतून जमा झालेली काही रक्कम दुष्काळग्रस्तांना देण्याचे निश्चित केले आहे. चौपाटीचे उद्घाटन औपचारिक पद्धतीने झाल्यानंतर सर्वच स्टॉलवर खवय्यांची एकच गर्दी झाली. पहिल्याच दिवशी नऊ हजाराहून अधिक जणांनी महोत्सवास भेट दिल्याचे संयोजकांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी हा आकडा अधिक वाढण्याचा अंदाज आहे. रविवारी या उपक्रमाचा समारोप होणार आहे. त्यामुळे सायंकाळी पाच ते १० वेळेत खाद्यपदार्थाचा नाशिककरांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.