डोंगरे वसतिगृह मैदानापासून सुरुवात

महाराष्ट्रात २०११ च्या जनगणनेच्या आधारे एकूण ९५ लाख वंजारी समाजाची लोकसंख्या असून या आधारावर समाजाला वाढीव आरक्षण मिळावे या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी सकाळी ११ वाजता नाशिकच्या डोंगरे वसतिगृह मैदानातून जिल्ह्य़ातील वंजारी समाजाचा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सर्वानी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन क्रांतिवीर व्ही. एन. नाईक वंजारी कृती आरक्षण समितीचे पदाधिकारी आणि आमदार नरेंद्र दराडे यांनी केले आहे.

दिंडोरी तालुक्यातील समाज बांधवांची बैठक तळेगांव येथे झाली. बैठकीस दराडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्ही. एन. नाईक, संस्थेचे उपाध्यक्ष पी. आर. गीते यांनी आरक्षणाविषयी तसेच मोर्चात सहभागी होण्यासाठी काय नियोजन करण्यात आले आहे, त्याविषयी माहिती दिली. यावेळी वासुदेव भगत, सुदाम बोडके, डॉ. पुंडलिक धात्रक, मनीषा बोडके, संतोष कथार यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी दिंडोरी तालुक्यातील १६ गावांमधील समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. शिक्षकनेते मोहन चकोर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार दराडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन मोहन चकोर यांनी केले.