अनिकेत साठे

जवळपास तीन दशकांपासून नवीन तोफांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या भारतीय तोफखाना दलाच्या भात्यात ‘के-९ वज्र’ आणि अति उंच पर्वतीय क्षेत्रात वापरता येतील, अशा हलक्या वजनाच्या एम ७७७ तोफा समाविष्ट होत आहेत. बोफोर्स तोफा घेतल्यानंतर आजतागायत नवीन तोफांची खरेदीच झालेली नव्हती. नवीन तोफा मिळत नसल्याने बोफोर्स आणि १९७१ च्या युद्धात वापरलेल्या जुनाट तोफांवर दलास काम करावे लागत होते. तोफखान्याच्या आधुनिकीकरणाची कागदावर राहिलेली प्रक्रिया यानिमित्ताने गतिमान होत आहे.

तोफखाना दलाच्या देवळाली कॅम्प येथील मुख्य प्रशिक्षण केंद्रात शुक्रवारी सकाळी १० वाजता संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांच्या हस्ते के-९ वज्र, हलक्या वजनाची एम ७७७ या तोफा आणि युद्धभूमीवर कोणत्याही तोफेला खेचून नेण्याची क्षमता असणारे वाहन तोफखाना दलात समाविष्ट करण्यात येणार आहे. भारतीय तोफखाना दलाकडे वेगवेगळ्या अंतरांवर मारा करणाऱ्या तोफा आहेत. जुनाट तोफांचे बॅरल आणि सुटे भाग उपलब्ध होत नसल्याने त्यांची देखभाल दुरुस्ती जिकिरीची ठरली आहे. त्यामुळे सर्व तोफा एकाच क्षमतेच्या (१५५ एम.एम.) ठेवण्याचे आधीच निश्चित झाले. स्वीडिश बनावटीच्या बोफोर्स तोफा खरेदीचा विषय राजकीय पटलावर इतका वादग्रस्त ठरला की, पुढील काळात तत्कालीन केंद्र सरकारने नवीन तोफा खरेदी करण्याची हिंमत दाखविली नाही. ही कोंडी केंद्रातील विद्यमान सरकारने फोडली. आधुनिकीकरणाची प्रक्रिया रखडली होती. हे लक्षात घेऊन विद्यमान सरकारने दक्षिण कोरियन बनावटीच्या के-९ वज्र – टी १०० तोफा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १० तोफा दक्षिण कोरियातून घेऊन उर्वरित ९० तोफांची देशात निर्मिती करण्यात येणार आहे.

१५५ एमएम क्षमतेच्या या तोफेची ४० किलोमीटरवरील लक्ष्य भेदण्याची क्षमता आहे. तोफखाना दलाच्या भात्यात हलक्या वजनाच्या तोफा समाविष्ट करण्याचा रेंगाळलेला विषय अमेरिकन बनावटीच्या ‘एम ७७७’ हलक्या वजनांच्या तोफांमार्फत मार्गी लागत आहे. पुढील काही वर्षांत तोफखाना दलात या १४५ तोफा दाखल होतील. भारतीय तोफखान्यात सध्या अवजड आणि जुनाट तोफांचा भरणा आहे. चीनलगतच्या उंच पर्वतीय सीमावर्ती भागात त्यांचा वापर करणे अवघड आहे. अति उंच प्रदेशात वापरता येतील, अशी एम ७७७ ही तोफ आहे. बोफोर्स आणि इतर तोफांचे वजन साधारणत: १३ ते १४ टन आहे. तुलनेत एम ७७७ चे वजन केवळ चार टन आहे. युद्धकाळात इतका भार वाहू शकणाऱ्या हेलिकॉप्टरद्वारे तिला तातडीने रणभूमीवर तैनात करता येईल. नवीन तोफांच्या जोडीला युद्धभूमीवर तोफांना तातडीने कार्यप्रवण करता यावे म्हणून खास वाहनही समाविष्ट होत आहे. प्रदीर्घ काळ रखडलेल्या गरजा पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याने दलाची प्रहारक क्षमता वाढणार असल्याची तोफखाना दलातील अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया आहे.

तोफखाना दलाची स्थिती

सद्य:स्थितीत ४२ किलोमीटर अंतरावर मारा करण्याची क्षमता असणारी दलाकडील तोफ म्हणजे बोफोर्स. तोफखान्याच्या भात्यात समाविष्ट होऊन तिलाही बराच काळ लोटला आहे. पाकिस्तानशी १९७१ मध्ये झालेल्या युद्धानंतर खरेदी केलेल्या बहुतेक तोफा आजही वापरात आहेत. त्यात १७ किलोमीटपर्यंत मारा करणारी १०५ एम. एम. लाइट फिल्ड गन आणि १०५ एम. एम. इंडियन फिल्ड गन आणि २७ किलोमीटर अंतरावरील लक्ष्य भेदण्याची क्षमता असणारी १३० एम. एम. रशियन फिल्ड गन यांचा समावेश आहे. बोफोर्स वगळता उर्वरित तोफांना दाखल होऊन ३५ ते ४० वर्षांहून अधिकचा काळ लोटला आहे. त्यांचे आयुर्मान संपुष्टात येऊनही अपरिहार्यपणे त्या कार्यप्रवण ठेवणे भाग पडले आहे.