शहरासह जिल्ह्यात अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी नाशिकहून भोपाळ पाठोपाठ दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी मध्य रेल्वेने उत्तर प्रदेशातील लखनौसाठी दुसरी विशेष गाडी सोडली. या रेल्वेगाडीतून ८४७ मजूर आपल्या घराकडे रवाना झाले. बऱ्याच प्रतीक्षेनंतर घरी परतण्याची व्यवस्था झाल्यामुळे उत्तर प्रदेशातील मंडळींनी ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘महाराष्ट्र सरकार की जय’ अशी घोषणाबाजी करत नाशिकचा निरोप घेतला. दुसरीकडे, परराज्यात जाण्याची मुभा मिळाल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो परप्रांतीय मजुरांनी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली. पोलिसांनी सामाजिक अंतराचे पालन होऊन ही प्रक्रिया पार पडेल याची खबरदारी घेतली.

देशात ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी परतण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. शुक्रवारी रात्री मुंबहून आलेल्या विशेष रेल्वेगाडीने नाशिकरोड रेल्वे स्थानकातून ३३२ मजुरांना भोपाळकडे रवाना करण्यात आले. रेल्वे स्थानकावर गर्दी, गोंधळ होणार नाही याची खबरदारी घेऊन ही प्रक्रिया यशस्वी करण्यात आली. याच दिवशी लखनौसाठी रेल्वेगाडी सोडली जाणार होती. परंतु तांत्रिक कारणास्तव ती शनिवारी सकाळी सोडण्यात आली. मुंबई आणि उपनगरांतून पायी उत्तर प्रदेशकडे निघालेल्या मजुरांना इगतपुरी, नाशिक येथे थांबवून निवारागृहात त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. या सर्व मजुरांना विशेष रेल्वेने उत्तर प्रदेशला रवाना करण्यात आले. स्थलांतरीत मजुरांना निरोप देण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे, पालिकेच्या उपायुक्त अर्चना तांबे आदी उपस्थित होते.

दीड महिन्यांत स्थलांतरीत मजुरांना दोन वेळचे जेवण, चहा, नाश्ता देण्यात येत होते. या सर्वाची वेळोवळी आरोग्य तपासणी देखील करण्यात आली. त्यांच्या मुलांना लसीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे यामध्ये जे अजूनही करोना संशयित वाटत होते, त्यांना नाशिक येथेच थांबविण्यात आले असून त्यांच्या आरोग्याची काळजी आपण घेत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. रेल्वेगाडीने जाणाऱ्यांना दोन वेळचे जेवण, पिण्याचे पुरेसे पाणी देण्यात आले आहे. दरम्यान महापालिकेच्या निवारागृहांमध्ये वास्तव्यास असणाऱ्या ३६५ नागरिकांना या रेल्वेगाडीने गावी जाण्यास मिळाले. त्यांना रेल्वे स्थानकापर्यंत पोहचविण्यासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. या वाहनांचे र्निजतुकीकरण करण्यात आले. तसेच रेल्वे प्रवासात सामाजिक अंतर कायम राहील याची दक्षता घेण्यात आल्याचे पालिकेच्या उपायुक्त अर्चना तांबे यांनी

सांगितले.

नाशिकसह जिल्ह्यात अडकलेल्या स्थलांतरीत परप्रांतीय मजुरांना शुक्रवारी आणि शनिवारी विशेष रेल्वेने भोपाळ तसेच लखनौ येथे नाशिकरोड स्थानकातून रवाना करण्यात आले.