स्वातंत्र्य दिनानिमित्त शहर परिसरात राष्ट्रध्वजाला वंदन करत विविध कार्यक्रम साजरे होत असतांना पाश्चात्य देशातून आलेली तरुणाई हा माहोल पाहून काहीशी भारावली. वेगवेगळ्या कार्यक्रमात ऐकलेले ‘सारे जहॉं से अच्छा..’ या गीताचे बोल अलगद त्यांच्या तोंडून उमटले. भारतीय संस्कृती महान असली तरी सामाजिक प्रश्नांबाबत नागरिकांमध्ये सजगता का नाही, शासन शिक्षक, कर्मचारी या घटकांना कामाचा मोबदला देते तर कामे योग्य पद्धतीने का होत नाही नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. निमित्त होते, आयसेक संस्थेच्या वतीने आयोजित अभ्यास दौऱ्याचे.
आयसेक ही सामाजिक संस्था युनिसेफसोबत काम करत आहे. पाश्चात्त्य देशातील तरुणाईला भारतीय संस्कृती, येथील परंपरा, सद्यस्थिती याचा अभ्यास करता यावा तसेच स्थानिक युवकांनाही पाश्चात्त्य देशातील संस्कृती आणि सद्यस्थितीचा अभ्यास करता यावा यासाठी संस्था काम करत आहे. दोन विचारधारांमध्ये समन्वय साधण्याचे हे काम मुख्यत्वे युवा पिढीसोबत सुरू आहे. त्या अंतर्गत तीन महिन्यांपासून महापालिकेसह अन्य काही संस्थांसोबत त्यांचे विविध विषयांवर काम सुरू आहे. इजिप्त, बहारीन, टर्की, चीन, दुबई, अमेरिका येथून आलेले १६ विद्यार्थी नाशिकमध्ये येऊन देशात इतर ठिकाणी अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले. त्यात शिक्षण, आरोग्य, कुपोषण, बाल कामगार, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, महापालिका, स्मार्ट सिटी यासह अन्य काही महत्वपूर्ण विषयांची निवड करत शिष्यवृत्तीच्या माध्यमातून नियोजित कालावधीत अभ्यास दौरा पूर्ण करत ते आपला अहवाल तयार करत आहेत. त्यातील इस्लाम रॅशिडे, रावन अ‍ॅडेल, झैनब अ‍ॅलमुबाद, जीम कँग, हार्पर ली हे नाशिकमध्ये वास्तव्यास आहेत. महापालिकेच्या सहकार्याने ते प्राथमिक शिक्षणावर काम करत आहेत. १८ ते २३ वयोगटातील हे विद्यार्थी सध्या महापालिकेची शाळा क्र. १ आणि ६ मध्ये शिक्षक
म्हणून काम करतात. विद्यार्थ्यांना इंग्रजी मुळाक्षर गिरवणे, संभाषण कौशल्य कशा पद्धतीने विकसित करता येईल, भाषेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी काय करावे याबद्दल मार्गदर्शन करत आहेत. यासाठी समन्वयक म्हणून संस्थेचे रोहित तनपुरे आणि शिव पुष्पजा कटय़ारे काम पाहत आहे.
स्थानिक शिक्षण पद्धतीवर या विद्यार्थ्यांनी ताशेरे ओढले. बहारीन येथील हिबा अ‍ॅल्सवाडच्या मते मुले खरंच खूप हुशार आहेत. मात्र त्यांना योग्य पद्धतीने शिकवले जात नाही. शिक्षक कसला पगार घेतात हेच समजत नाही. मुलांमध्ये शिकण्याची उत्सुकता आहे. मात्र शिक्षक त्यात कमी पडत आहे.
शासन शिक्षकांना त्याच्या कामासाठी मोबदला देते तर त्या प्रमाणात त्यांनी काम नको करायला? शिक्षण क्षेत्र सुधारण्यास खूप वाव असल्याचे परखड मत त्याने मांडले. चीन येथील जीम कॅगने काही विद्यार्थ्यांना भाषेच्या अडथळ्यामुळे मी काय शिकवतो हे समजत नव्हते, काहींची ते समजून घेण्याची मानसिकता नव्हती. शाळेतील शिक्षकांना माहिती आहे, या मुलांना कसे समजवायचे ते. मुलांमध्ये खोडसाळपणा खूप असला तरी ती हुशार असल्याचे प्रकर्षांने जाणवले.