22 February 2019

News Flash

हरित सेनेचा टक्का वाढविण्यासाठी धडपड

‘ग्रीन आर्मी’ अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणी तसेच ‘वृक्ष आपल्या दारी’ असे उपक्रम हाती घेतले आहे

प्रतिनिधिक छायाचित्र

वन विभागाच्या ‘एकच लक्ष्य..’ अंतर्गत आतापर्यंत २५ हजार सैनिकांची नोंदणी

शहर परिसराच्या सभोवताली हरित पट्टा वाढावा यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या वन विभागाने हरित सेनेच्या माध्यमातून ‘एकच लक्ष्य..’ म्हणत वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेत ‘ग्रीन आर्मी’ अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणी तसेच ‘वृक्ष आपल्या दारी’ असे उपक्रम हाती घेतले आहे. या उपक्रमास स्थानिकांचा चांगला प्रतिसाद लाभत असून आतापर्यंत २५ हजार नाशिककरांनी हरित सेनेत नोंदणी केली आहे. ही आकडेवारी वाढावी यासाठी वन विभाग धडपड करीत आहे. नागरिकांचा पर्यावरण प्रेमाचा उत्साह काही दिवस मर्यादित राहतो. ही बाब लक्षात घेऊन हरित सेनेच्या माध्यमातून पर्यावरणाशी निगडित नियमित काम होण्याची व्यवस्था केली जात आहे.

शहर परिसरातील हरित पट्टा वाढावा, यासाठी वन विभाग प्रयत्नशील आहे. समविचारी पर्यावरणप्रेमी संस्थांच्या मदतीने शहरात देवराई, म्हसरूळ येथील टेकडी परिसरात हिरवळ फुलविण्यास वन विभागाला यश आले आहे. पर्यावरणप्रेमींचा उत्साह अनेकदा जागतिक पर्यावरण दिन, ओझोन दिन अशा पर्यावरणाशी संबंधित दिवसांपुरता सीमित असतो. पर्यावरण संवर्धनाची ही चळवळ अखंड सुरू राहावी, यासाठी वन विभागाने ‘ग्रीन आर्मी’ अर्थात हरित सेनेच्या माध्यमातून काम सुरू केले आहे. सामान्य नागरिक म्हणजे १२ वर्षांपासून पुढील वयोगटाला यामध्ये सामावून घेण्यासाठी जिल्ह्य़ातील शाळा, महाविद्यालयांमध्ये हरित सेना गट तयार करण्यात येत आहे. काही ठिकाणी पर्यावरणप्रेमी संस्थाही यात स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहे. वन विभागाच्या संकेतस्थळावरील ग्रीन आर्मी ऑनलाइन पद्धतीने ही नोंदणी सध्या सुरू आहे. आतापर्यंत २५ हजार नाशिककरांनी यामध्ये नोंदणी केली आहे. यासाठी ‘वृक्ष आपल्या दारी’ या उपक्रमात आंबा, चिंच, शिसव, गुलमोहर, आवळा यांसह मोठी झाडे अल्पदरात नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

ग्रीन अ‍ॅपची मदत..

ग्रीन अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणी करत वृक्ष लागवडीच्या कामात हरित सैनिकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. नोंदणीकृत हरित सैनिकांची टक्केवारी वाढावी, यासाठी वन विभागाकडून त्यांना विशेष सहभाग प्रमाणपत्र दिले जाते. ज्याचा उपयोग ते राज्यातील इतर वन विभागात करू शकतात, एखाद्या वन प्रकल्पासाठी त्यांना हे प्रशस्तिपत्र फायदेशीर ठरू शकते, अशी माहिती वन अधिकारी रवींद्र सोनार यांनी दिली.

First Published on February 6, 2018 2:42 am

Web Title: forest department launch green army to boost tree plantation