जंगलातून जाणारे आणि जंगलालगतचे रस्ते वन्यप्राण्यांसाठीच नव्हे, तर पक्ष्यांसाठीसुद्धा कर्दनकाळ बनल्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीवर नियंत्रणाचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सलग दोन दिवसांपासून बिबटय़ासह अस्वलाचा मृत्यू झाला, त्यामुळे रस्त्यावरील वाहनेच नव्हे, तर रेल्वेचीसुद्धा गती आणि जैवविविधतेचे संरक्षण प्रश्नांकित झाले आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पच नव्हे, तर राज्यातील इतरही अभयारण्यातील आणि त्यालगतचे रस्ते वन्यप्राणी आणि पक्ष्यांच्या मुळावर उठले आहेत. यात सर्वाधिक बळी सरपटणाऱ्या प्राण्यांचे जात आहेत. पाच वर्षांपूर्वी इंटरनॅशनल फॉरेन्सिक सायन्स प्रायव्हेट लिमिटेड या खासगी संस्थेने चंद्रपूर-मुल मार्गावर ५० किलोमीटरच्या परिसरात केलेल्या सर्वेक्षणात केवळ एका दिवशी ३४ सरपटणारे प्राणी वाहनांखाली येऊन मृत्युमुखी पडल्याचे आढळले. जंगलातून आणि जंगलालगतच्या रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनांसाठी वेगमर्यादा आखून देण्यात आली आहे. मात्र, या मर्यादेचे पालन केले जात नाही. राष्ट्रीय महामार्गावरून रात्रीच्या वेळी सर्रासप् ९०-१०० किमी प्रति तास या वेगाने वाहने जातात. या वाहतुकीवर नियंत्रण आणण्याची मागणी अनेकदा करण्यात आली, पण हे त्या त्या विभागाचे काम आहे, असे सांगून आजपर्यंत चालढकल करण्यात आली. एप्रिल २०१३ मध्ये रेल्वेच्या धडकेने वाघाचा मृत्यू झाला तेव्हा संवेदनशील क्षेत्रातून जाणाऱ्या रेल्वेची गती ४० किमी प्रति तास असावी, असे सांगण्यात आले होते. कालच्या घटनेने याचे पालन कुणीही केलेले नाही, हे सिद्ध झाले. व्याघ्र कक्ष समिती ही अशाच घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी गठीत करण्यात आली आहे, पण या समितीच्या बैठकाच गांभीर्याने होत नसल्याने अशा घटनांवरील नियंत्रण ही दूरगामी बाब ठरली आहे. जंगलातून आणि लगतच्या प्रत्येक रस्त्यावर दररोज कितीतरी वन्यप्राणी आणि पक्षी वाहनांचे बळी ठरत आहेत. घटना उघडकीस आली तरच त्याची नोंद होते अन्यथा, या घटना उघडकीससुद्धा येत नाहीत.

सीसीटीव्ही कॅमेरेही हवेत

राष्ट्रीय महामार्गावर किंवा जंगलाची संलग्नता असणाऱ्या रस्त्यांवर नियमित गस्त अत्यावश्यक आहे. याशिवाय, अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावणेसुद्धा तेवढेच आवश्यक आहे. संवेदनशील क्षेत्रात वाहनांच्या गतीवर मर्यादा असावी. ८० टक्के अपघात हे रात्री, तर २० टक्के अपघात दिवसा होतात.

-यादव तरटे, वन्यजीव अभ्यासक

मेळघाट सुदैवी..

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा परिसर त्या तुलनेत बराच सुदैवी असून मेळघाटातील जवळपास सर्वच संवेदनशील क्षेत्रात रात्री १० ते सकाळी ६ वाजतादरम्यान वाहतुकीवर र्निबध घालण्यात आले आहेत. सेमाडोह-हरिसाल क्षेत्रातही रात्रीच्या वेळी दर दोन तासांनी वाहने सोडली जातात. बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यालगतचा रस्ताही रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत बंद करण्यात आला आहे.

खबरदारीची उपाययोजना अपेक्षित 

वन्यप्राण्यांच्या संचाराची वेळ रात्रीची असल्याने जंगलातील आणि जंगलालगतचे रस्ते रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद असायला हवे. शिवाय, अशा घटना टाळण्यासाठी खबरदारीची उपाययोजना आखणे अपेक्षित आहे. रस्त्यावर गतीरोधक, भुयारी मार्ग, उड्डाणपूल, कुंपण, वन्यप्राणी संचारमार्ग आणि वाहनांच्या गतीविषयीचे सूचना फलक असायला हवे.

– किशोर रिठे, माजी सदस्य, केंद्रीय वन्यजीव मंडळ